Home ठळक बातम्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण रेडिओलॉजीस्टकडून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्याची अनोखी गोड...

क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण रेडिओलॉजीस्टकडून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्याची अनोखी गोड भेट – डॉ. प्रशांत पाटील

राज्यभरातून 16 जिल्ह्यातील तब्बल 300 रेडिओलॉजिस्टचा स्पर्धेत सहभाग

कल्याण दि.15 जानेवारी :
खेळाच्या माध्यमातून आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रेडिओलॉजी प्रिमियर लीग क्रिकेट (RPL) स्पर्धेचे विजेतेपद मुंबई लिजेंडने पटकावले. तर संपूर्ण स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करणारा नाशिक चॅम्पस् हा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला.

यंदाची आठवी रेडिओलॉजी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनला पहिल्यांदाच मिळाला होता. मात्र अत्यंत नेटके आणि सुदंर नियोजन करत आयोजकांनी या स्पर्धेवर आपली वेगळी छाप सोडली. कल्याण झोन अंतर्गत झालेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील 16 संघ आणि त्यांचे 300 च्या आसपास रेडिओलॉजिस्ट खेळाडू सहभागी झाले होते. अंबरनाथ येथील ऑर्डीनन्स फॅक्टरी मैदान आणि भिवंडीतील तीन अशा चार मैदानांवर गेले दोन दिवस हे क्रिकेटचे सामने खेळवले गेले.

आरोग्यासोबत जपली सामाजिक बांधिलकीही…
समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर मंडळींकडून आरोग्याचा संदेश देण्यासह या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या कल्याण झोनतर्फे शहापूरमधील उठावा, भातसई, कुंदन पाडा येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना रक्षा उपक्रमाअंतर्गत यावेळी विविध क्रीडा साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेच्या रक्षा प्रकल्पअंतर्गत (SAVE GIRL CHILD) ही मदत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

डॉक्टरांचा हा फिटनेस अतिशय कौतुकास्पद – डी सी पी सचिन गुंजाळ…
ऐरव्ही आपल्या सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी क्रिकेटच्या मैदानावर दाखवलेला हा फिटनेस अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी व्यक्त केले. तसेच या क्रिकेट स्पर्धेचे उत्तमरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.

या क्रिकेट सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाला महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गांधी, सचिव प्रदीप सांगोले, खजिनदार संदीप महाजन, माजी अध्यक्ष शैलेश संघनानी, राष्ट्रीय रेडिओलॉजिस्ट संघटनेचे खजिनदार समीर गांधी, माजी राष्ट्रीय सचिव, डॉ. संदीप कवताले, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत ओंकार, रक्षा उपक्रमाच्या समन्वयिका डॉ. रौनकलक्ष्मी शिरसाट उपस्थित होते.

तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट संघटना कल्याणचे अध्यक्ष डॉ. हरीश शहाददपुरी, सचिव संदेश रोठे, खजिनदार डॉ. दीक्षित, ऑर्गनायजिंग चेअरमन डॉ. प्रशांत पाटील, डॉ. निहार ढोक, डॉ. राजेश मुळे, डॉ. राजेश कौरानी यांच्यासह अनेकांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा