नॅशनल पॅरा स्विमिंग स्पर्धेत कल्याणच्या ५ खेळाडूंची लयलूट
कल्याण – डोंबिवली दि.१ एप्रिल :
दिव्यांग खेळाडूंना विविध खेळांचे सराव करण्यासाठी होणारी कुचंबणा लक्षात घेऊन केडीएमसी प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग खेळाडूंच्या क्रिडा सरावासाठी कल्याण डोंबिवलीत विशेष मैदानं मैदान तयार करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली. गेल्या महिन्यात उदयपूर येथे झालेल्या एकविसाव्या पॅरास्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये कल्याण डोंबिवलीतील ५ खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. या दिव्यांग खेळाडूंच्या सत्कारानंतर आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली.
२३ ते २७ मार्च दरम्यान उदयपूरमध्ये घेण्यात आलेल्या या पॅरा स्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये एकूण २३ राज्यांतील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६६ दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी ५२ दिव्यांग खेळाडूंनी शंभराहून अधिक पदकांची लयलूट केली आहे.
महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंनी सर्वाधिक म्हणजे 386 पॉईंट मिळवत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात वास्तव्य करणाऱ्या गीतांजली चौधरी, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, सानिया शेख, आर्यन जोशी हे दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सुवर्णपदक आणि कांस्य पदकाचे मानकरी ठरल्याची माहिती त्यांच्या टिम मॅनेजर अर्चना जोशी यांनी दिली. तर केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांचे महाराष्ट्राच्या खेळाडूंना विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.