खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली महत्त्वाची बैठक
कल्याण दि.20 जुलै :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी ” नवी मुंबई एनएच – ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार असून शहरांतर्गत वाहतुकीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे (Mp Dr Shrikant Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने या मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीबाबत एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.(A new option for intra-city transport: A step forward for the ambitious “Access Control Road” project)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास जात असून यामुळे मतदारसंघाच्या वाहतुकीचा चेहरामोहरा यामुळे बदलणार आहे.
याच पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एनएच – ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या उभारणीबाबत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी ”टाटा कन्सलटींग इंजिनियर” कंपनीने सुचविलेल्या अनेक पर्यायांवर यावेळी त्यांच्या तज्ज्ञांशी खासदार डॉ.शिंदे यांनी संवाद साधला. तर टाटा मार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ( तुर्भे – तळोजा – उसाटने आणि खारघर – तुर्भे लिंक रोड ) हा रुट ॲक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
असा आहे ॲक्सेस कंट्रोल मार्ग –
– बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे.
– यामार्गावरून पुढे जात पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे.
– यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेदुटणे येथे मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे. या मार्गावरील अत्यंत महत्वाचा हा इंटरचेंज असून येथून वाहनचालकांना मेट्रो – १२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हीटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण – शिळफाटा मार्गावर देखील येथून जाता येणार आहे.
– या पुढे शिरढोण येथे या रस्त्यावरून मल्टी मोड कॉरिडोअर मार्गाला जाता येणार आहे. या मल्टिमोड कॉरिडोर रस्ता उभारणीचे काम देखील जलदगतीने सुरु आहे. या या मल्टिमोड कॉरिडोर रस्त्यामुळे थेट पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवे येथे जाणार आहे. तर हाच मल्टिमोड कॉरिडोर सीटीएस कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे.
– शिरढोण येथे तिसरा इंटरचेंज असल्याने कल्याण येथील २७ गावे याठिकाणी जोडली जाणार आहेत. तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हीटी असणार आहे. उसाटणे येथील रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. तर पुढे मुंबई – पनवेल हायवेला देखील या मार्गाची जोडणी करण्यात येणार असून नागरिकांना पनवेल येथे जाणे सोपे होणार आहे.
– तर पुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील लवकरच सुरु होणार आहे. या लिंक रोड द्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे.
या प्रकल्पाचे फायदे
– हा संपूर्ण मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून ग्रीन फिल्ड मार्ग असणार
– बदलापूर येथून मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाला रस्ता जोडला जाणार असून याद्वारे समृद्धी महामार्गालाही जाता येणार .
– तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई – आग्रा हायवे येथे थेट जात येणार आहे. यामुळे नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार.
– शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार. यामुळे शहरातील वाहतूक जलदगतीने होईल आणि इतर शहरांमध्ये जाण्यासाठी एक जलद पर्याय उपलब्ध होईल.
– या मार्गाच्या उभारणीनंतर बदलापूर ते डोंबिवली येथील वाहनचालकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येणार आहे. तसेच इतर जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गांवर देखील सहजतेने जाणार आहे.