कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा पाया रचण्याचा प्रामाणिक प्रयत्न
कल्याण दि. 7 जानेवारी :
ठाणे जिल्ह्याच्या पुढील 20 वर्षांच्या विकासाचा मास्टर प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेला आहे. ज्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. सुभेदार वाडा कट्टा आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेत विकासाच्या वाटेवर असणारी कल्याण डोंबिवली शहरे या विषयावर ते बोलत होते. (The work of making a master plan for the development of Thane district has started from the Chief Minister – MP Dr. Shrikant Shinde)
कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा पाया रचण्याचा प्रामाणिक प्रयत्न…
गेल्या 8 वर्षांत आपण केंद्र सरकार, राज्य सरकारसह विविध शासकीय विकास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणत इथल्या पायाभूत सुविधांची कामे सुरू केली आहेत. आपल्यासारख्या घनदाट लोकवस्तीच्या शहरात विकासकामे करतांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कामांचा लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल याचा विचार करून कल्याण डोंबिवलीच्या विकासाचा पाया रचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असल्याची प्रांजळ कबूली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. आतापर्यंत कल्याण असो डोंबिवली असो की अंबरनाथ ही शहरे नसून अजूनही एखादे गावच आहेत अशी लोकांची यापूर्वी धारणा होती. मात्र गेल्या आठ वर्षांत या सर्व ठिकाणी सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांमुळे या भागांचा कायापालट करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एम एम आर रिजनमध्ये मुंबईप्रमाणेच विकासकामे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत वेगाने निर्णय प्रक्रिया राबवण्याचे काम करत आहे. जी कामे वर्षानुवर्षे निर्णयाभवी रखडली होती ती या सरकारने अत्यंत कमी वेळेत जलदगतीने पूर्ण केली आहेत आणि काही पूर्णत्वास येत आहेत. याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता हा महत्त्वाकांक्षी महामार्ग अतिशय कमी वेळात पूर्ण करून दाखवला. तर आपली आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राज्य सरकारकडून ज्याप्रकारे कामांचा धडाका सुरू आहे तीच सर्व विकासकामे आपण एमएमआर रिजनमध्येही केली जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
काळू आणि शाई धरणाला राज्य सरकारची मंजुरी…
ठाणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता इथल्या पाण्याची समस्या हळूहळू उग्र रूप धरू लागली आहे. याचा विचार करून काळू आणि शाई धरणाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. येणाऱ्या काळात पाणी देणारी आपली हक्काची धरणे ही आपल्याला उभी करावी लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या विषयी लक्ष ठेवून असून सतत त्यासंदर्भात बैठकाही सुरू आहेत. त्यासोबतच कचरा समस्येला आळा घालण्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये क्लस्टर (एकत्रित) पद्धतीने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. येत्या काळात कल्याण डोंबिवली शहरांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती…
यापूर्वी कल्याण डोंबिवली शहरांची नावे घेतली की लोकांकडून बोटं मोडली जायची. मात्र कल्याण डोंबिवली शहरांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. ज्यामुळे पुढील दोन वर्षांत इथली वाहतुक कोंडीची समस्या बऱ्यापैकी कमी झालेली आपल्याला पाहायला दिसेल. इथल्या झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येला पूरक ठरेल अशा पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार व्हायला हवा होता. परंतू आपल्या गेल्या 8 वर्षांच्या कार्यकाळात आपण पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. जेणेकरून येत्या काळात इथल्या लोकांचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत झालीत एवढी विकासकामे…
कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा गेल्या आठ वर्षांचा विचार करायचा झाला तर अनेक प्रमूख आणि इतर वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे आज पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येईल. मध्य रेल्वेच्या ठाणे – कल्याण मार्गादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गाचे काम कित्येक वर्षे प्रलंबित होते. मात्र आपण निवडून आल्यानंतर या प्रमूख कामाचा पाठपुरावा करत आणि अनेक अडचणींवर मात हे काम पूर्ण करून घेतले. त्यासोबतच कल्याण – शीळ रस्त्याचे रुंदीकरण, नविन पत्रीपुल, दुर्गाडी पुल, काटई – ऐरोली उन्नत मार्ग, खोणी – शिळफाटा मार्ग, माणकोली उड्डाणपूल, कल्याण आणि अंबरनाथमध्ये स्टेशन परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प (Satis), कल्याण यार्ड रीमॉडेलिंग, 85 टक्के पूर्णत्वास आलेला कल्याण रिंग रोड प्रकल्प, विकासकामात बाधित लोकांचे बीएसयूपी प्रकल्पात पुनर्वसन, शीळफाटा ते रांजणोली मार्गावर नागपूरप्रमाणे डबल डेकर एलिव्हेटेड प्रकल्प, कल्याण तळोजा मेट्रो बांधण्यासाठी पुढील आठवड्यात निविदा जाहीर होणार, रेल्वे आणि रस्ते प्रकल्पासोबतच पाच जलवाहतूक प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून येत्या काळात पाण्यातून आपला प्रवास शक्य होणार असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकासकामांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगराध्यक्ष राम पातकर, कल्याण जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रत्नाकर फाटक, डॉ. आनंद कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.