जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचा दिमाखदार अमृत महोत्सवी वर्षाच्या सोहळा
कल्याण दि.30 जानेवारी :
ज्याप्रमाणे पब्लिक हे माझं टॉनिक आहे अगदी तशीच आप्पा शिंदे हेदेखील समाजासाठी टॉनिक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणात काढले. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ अर्थातच आप्पा शिंदे यांचा अमृत महोत्सवी (75 वा) वाढदिवस एका दिमाखदार सोहळ्याद्वारे संपन्न झाला. या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी शायराना अंदाजमध्ये आणि अतिशय खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले.
शेवटी आपण जगन्नाथ, मीपण एकनाथ…तुम्ही पण शिंदे… मी पण शिंदे… आपण दोघेही एकदम काम के बंदे. तर कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणाला कोणता डोस पाजायचा हे आप्पांनाही चांगलेच माहिती आहे. त्यामुळेच त्यांना अजिबात हलक्यात घेऊ नका असे सांगतानाच अडीच वर्षांपूर्वी काही जणांनी आपल्यालाही हलक्यात घेतले आणि त्यानंतर काय घडले हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वीच्या आपल्या बंडाची आठवण ताजी केली. ज्याला उपस्थितांनी हास्याच्या निनादात आणि टाळ्यांच्या कडकडाटात एकनाथ शिंदे यांना दाद दिली.
तर आप्पा यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. सर्व सामान्यांसाठी जगताना दुसऱ्याच दुःख आपले समजून ते दूर करतात. स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे कठीण असतं आणि ते कठीण काम आपल्या आप्पांनी सोपं करून दाखवल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी आप्पा शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
आप्पांचे व्यक्तिमत्त्व हे अजातशत्रू आणि प्रेरणादायी – आमदार रविंद्र चव्हाण
जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी वर्षानुवर्षे रुग्णसेवा अविरत सुरू ठेवली असल्याचे सांगत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनीही आप्पा शिंदे यांचे अभिष्टचिंतन केले. समाजाची सेवा करण्याचे व्रत हाती घेत गेल्या अनेक वर्षांपासून आप्पा अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे अजातशत्रू आणि प्रेरणादायी आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली परिसरातील कार्यकर्त्यांसाठी जगन्नाथ आप्पा हे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत रविंद्र चव्हाण यांनी आप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विलास जोशी, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड, डॉ. प्रशांत पाटील, निलेश शिंदे, रमाकांत मढवी, अरुण आशान, उपस्थित होते.