Home ठळक बातम्या कल्याणच्या सिंडीकेट परिसरात भलेमोठे झाड कोसळून घरांचे नुकसान

कल्याणच्या सिंडीकेट परिसरात भलेमोठे झाड कोसळून घरांचे नुकसान

घरांच्या दुरुस्तीची आमदार विश्वनाथ भोईर यांची ग्वाही

कल्याण दि.27 सप्टेंबर :
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेच्या सिंडीकेट परिसरात घरांवर भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळून पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरूस्ती करून देण्याची ग्वाही कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्याने या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कल्याण पश्चिमेच्या सिंडीकेट येथील नेहरू नगर, आतिश खान कंपाऊंड परिसरात आज सकाळी साडे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार घडला त्यावेळी घरांमध्ये तीन व्यक्ती उपस्थित होत्या. सकाळी साखरझोपेत असतानाच झाड पडल्याचा अचानक मोठा आवाज झाला. रेल्वे ट्रॅकशेजारी असलेले हे भलेमोठे झाड रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंड पलिकडे असलेल्या या घरांवर कोसळले.

तर या घटनेबाबत केडीएमसी अग्निशमन दलाला पाचारण केले असता अग्निशमन दलाचे जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिन्ही घरांमध्ये अडकून पडलेल्या 3 नागरिकांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमध्ये तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड पूर्णपणे पडण्यापासून रोखले गेले. अन्यथा याठिकाणी मोठी दुर्घटना झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. हे झाड इतके मोठे होते की अग्निशमन दलाचे कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत त्याला कापून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते.


पडझड झालेल्या घरांची तातडीने दुरूस्ती केली जाणार – आमदार विश्वनाथ भोईर
दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी गणेश जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना कळवली. त्यावर आमदार भोईर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाकडून केल्या जाणाऱ्या बचाव कार्याची पाहणी केली. तसेच हे झाड ज्या कुटुंबियांच्या घरांवर पडले होते त्या कुटुंबीयांशी संवाद साधला. हे झाड बाजूला करण्याचे अग्निशमन दलाचे काम जसे संपेल तसे लगेचच पडझड झालेल्या या घरांच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल अशी ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली. तसेच या घरांचे काम पूर्ण होईपर्यंत त्यातील कुटुंबियांच्या राहण्या आणि खाण्याची पुढील 2-3 दिवसांची सुविधाही आमदार भोईर यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या या संवेदनशीलतेबद्दल त्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा