एकवीरा देवीच्या मंदिराची प्रतिकृती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
कल्याण दि.20 ऑगस्ट :
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कल्याणात काल आगरी कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीची अतिशय भव्य अशी मिरवणूक काढली. ज्यामध्ये एकवीरा देवीच्या पालखीसोबतच एकवीरा देवीच्या मंदिराची बनवण्यात आलेली हुबेहूब प्रतिकृती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कल्याणातील आगरी कोळी समाज उत्कर्ष समितीच्या माध्यमातून हा सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आला. (A grand procession was taken out by the Agri-Koli brothers on the occasion of Narali Poornima)
कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या भव्य मिरवणूकीला प्रारंभ झाला. एकीकडे ढोल ताशांसह ब्रास बँड पथकांकडून वाजवण्यात येणाऱ्या सुमधुर कोळी गीतांवर आपल्या पारंपरिक वेशात ठेका धरणारे आगरी कोळी समाज बांधव. तर दुसरीकडे आगरी-कोळी समाजाच्या इतिहासाची महती दाखवणारे सुदंर असे चित्ररथ आणि त्यासोबतच कोळी बांधवांच्या साहसाचे प्रतीक असणारी त्यांची लाडकी होडी. आणि या सर्वांवर कळस चढवण्याचे काम केले ते आगरी कोळी समाजाची कुलदेवी असलेल्या एकवीरा देवीच्या मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीने. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्र रथावर अतिशय भव्य प्रमाणात ही मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. पारंपारिक बैलगाड्यांच्या सोबतीने शर्यतीच्या बैलांनाही यावेळी मिरवणुकीत आणण्यात आले होते. ज्यांच्यासोबत फोटो सेल्फी काढण्यासाठी तरुण वर्गाची मोठी गर्दी उसळली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे सहजानंद चौक, लालचौकीमार्गे ही मिरवणूक दुर्गाडी येथील खाडीकिनारी दाखल झाली. प्रथेप्रमाणे कल्याणातील खाडीमध्ये मानाचे श्रीफळ (नारळ) विधिवत अर्पण करून या मिरवणुकीची सांगता झाली. पारंपरिक वेशात सहभागी झालेले समाज बांधव आणि महिलांसोबतच तरुण पिढी आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले.
कल्याणातील या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला फार जुनी परंपरा आहे. कल्याणला विस्तीर्ण खाडी किनाऱ्यासोबतच नद्यांचा संगमही लाभला असल्याने पूर्वी याठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा व्हायचा. कोळी समाजाचे दिवंगत नेते अनंत तरे, पंढरीनाथ पाटील आणि दिपक भोईर यांनी या मिरवणुकीची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र काळाच्या ओघात लुप्त होऊ लागलेल्या या पारंपरिक उत्सवाचा वसा कल्याणातील आगरी कोळी समाज उत्कर्ष समितीच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम केले जात आहे. ही परंपरा आता दरवर्षी अशीच सुरू राहील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
या मिरवणुकीमध्ये आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, अर्जुन म्हात्रे, सुनिल वायले, प्रेमनाथ म्हात्रे, आगरी सेनेचे नेते चंद्रकांत ठाणकर, सुनिल खारूक यांच्यासह आगरी कोळी समाजाचे सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.