कल्याण दि.9 जानेवारी :
कल्याण पश्चिमेच्या काळा तलाव परिसरातील असणाऱ्या एका बंद इमारतीमध्ये असणाऱ्या सामानाला आज पहाटे 5 ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी कोणीही राहत नसल्याने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसली तरी इथे असणारे सामान आणि वस्तू जळून खाक झाल्या.
काळा तलाव परिसरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ काही वर्षांपूर्वी केडीएमसीचे निदान डायग्नोस्टिक सेंटर होते. याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या फर्निचर आणि इतर साहित्याला आज पहाटे ही आग लागली. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला स्थानिकांनी याबाबतची माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीचे शटर बंद असल्याने ते तोडून आणि खिडकीच्या काचा तोडून अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहीती अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली. ही इमारत बंद असल्याने या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
यावेळी कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे, संजय म्हस्के, निखिल ईसामे आदी अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
व्हिडीओ सौजन्य :- निशांत सागवेकर
माहिती सौजन्य :- केवल व्यास