केडीएमसीची आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
डोंबिवली दि.29 नोव्हेंबर :
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड (covid) व्हेरीयंटमूळे चिंता वाढली असतानाच दक्षिण आफ्रिकेतून काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत आलेली व्यक्ती कोवीड पॉझिटिव्ह आल्याने केडीएमसी सतर्क झाली आहे. या व्यक्तीचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईत पाठवले जाणार असून त्यानंतरच कोवीडचा हा कोणता व्हेरीयंट आहे ते स्पष्ट होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या आठवड्यात ही व्यक्ती 24 नोव्हेंबर रोजी आधी दिल्लीत आणि तेथून मुंबईत दाखल झाली. त्याचे कुटूंबीय तो घरी येण्याआधीच त्यांच्या नातेवाइकांकडे राहायला गेले असल्याने हा व्यक्ती घरात विलगीकरणात एकटीच राहत होता. दरम्यान डोंबिवलीत आल्यानंतर त्याला ताप येऊ लागल्याने त्याने कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे केडीएमसी साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. तर सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. त्याच्या कोवीड टेस्टचे नमुने आज जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईतील येथे प्रयोग शाळेत पाठवले जाणार आहेत. त्यानंतरच हा कोवीडचा नेमका कोणता व्हेरीयंट आहे हे स्पष्ट होईल असेही डॉ. पानपाटील यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून न जाता मास्क, सॅनिटायजर आणि वॅक्सीनेशन ही त्रिसूत्री काटेकोरपणे पाळावी आणि गर्दीत जाणे टाळावे. ज्यांनी अद्याप कोवीड लस घेतली नसेल अशा सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.