Home ठळक बातम्या केडीएमसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस; खड्डे – ट्रॅफिक जॅमच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये वाढता रोष

केडीएमसी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस; खड्डे – ट्रॅफिक जॅमच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये वाढता रोष

पावसाने उघडीप देऊनही केडीएमसीने खड्डे भरलेच नाहीत

कल्याण डोंबिवली दि.31 ऑगस्ट :
रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्यातून उडणाऱ्या धूळीसोबतच होणारी मोठी वाहतूक कोंडी. या सर्वांच्या त्रासामुळे इथल्या नागरिकांना दररोज प्रचंड असा शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागत आहे. इथल्या नागरिकांची अवस्था ही अक्षरशः “भीक नको पण कुत्रे आवर” या म्हणीसारखी झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने तर आपल्या निष्क्रियतेचा कळसच गाठला असून नागरिकांच्या सहनशीलतेचा जणू काही अंत पाहिला जात आहे. ( KDMC administration’s inaction; Potholes – Growing anger among citizens over the problem of traffic jams)

कोणतीही इच्छाशक्तीच केडीएमसी प्रशासनामध्ये दिसत नाही…
एकीकडे तथाकथित स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या या केडीएमसी प्रशासनाकडून इथल्या नागरिकांच्या साध्या मूलभूत गरजाही पूर्ण करता येत नाहीयेत. की दिवसागणिक राक्षसीरूप धारण करणाऱ्या खड्डे, वाहतूक कोंडी, बकाल स्टेशन परिसर, अस्वच्छता यांसारख्या नागरी समस्याही सोडवता येत नाहीयेत. किंबहुना या समस्या सोडवण्याची कोणतीही इच्छाशक्तीच या केडीएमसी प्रशासनामध्ये दिसत नाहीये. आपल्या एसी केबिनमध्ये बसून कागदी घोडे नाचवणे, आपापल्या जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलणे आणि आम्ही या शहरासाठी भरपूर काही तरी करतोय याचा खोटा आव आणणे, या पलिकडे केडीएमसी प्रशासनाला कशातही रस दिसत नाहीये.
(LNN News – Local News Network)

मग खड्डे भरण्यासाठी 22 कोटींची तरतूद कशासाठी ?
काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झाला असला तरी त्यापूर्वी तब्बल दोन आठवडे पावसाने उघडीप दिली होती. मग त्यावेळी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे का भरण्यात आले नाहीत? पाऊस थांबूनही हे खड्डे भरायचे नव्हते तर अर्थसंकल्पात तब्बल 22 कोटींची तरतूद कशासाठी केली आहे? केवळ माती आणि दगडांद्वारे खड्डे भरण्यासाठी 22 कोटी रुपयांचा खर्च येतो का? नागरिकांनी भरलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कराची अशी उधळपट्टी करण्याचे कारण काय? केडीएमसी प्रशासन केवळ कर गोळा करण्यासाठी आहे का ? नागरीकांना मूलभूत सुविधा कोण देणार? यासारखे अनेक गंभीर प्रश्न केडीएमसी प्रशासनाच्या या बेजबाबदार वर्तनातून निर्माण झाले आहेत.
(LNN News – Local News Network)

नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत पाहू नये…
आपल्या कामचुकारपणामुळे इथल्या लाखो लोकांना दररोज मोठा त्रास होत असून याच लोकांच्या करांच्या माध्यमातून आपल्याला पगार मिळतोय. किमान याची तरी लाज बाळगून या शहरांप्रती – इथल्या लोकांप्रती आपले काही तरी दायित्व आहे हे केडीएमसी प्रशासनाने ओळखायला हवे होते. परंतु दुर्दैवाने विद्यमान केडीएमसी प्रशासनाला त्याचा तर विसर पडलेलाच आहे, पण त्याचसोबत लोकांना जे पाहिजे ते नाही तर आम्हाला जसे हवे तसेच आम्ही करणार अशा अविर्भावाचा एक मस्तवालपणाही केडीएमसी प्रशासनामध्ये दिसून येत आहे. ज्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये केडीएमसी प्रशासनाविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. केडीएमसी प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत पाहू नये, नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्यास उद्रेक अटळ आहे.
(LNN News – Local News Network)

१ कॉमेंट

  1. What about new technology roads ? All roads are full of pathholes. Why not to responsibility first who has supervision and pass the bills of KDMC officers and then contractor. 95% drainage chambers are poor conditioned even after repairs within a month. Unstandard speed breakers.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा