कल्याण दि.5 जुलै :
लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलीसह सहा महिन्यांच्या चिमुरड्याची केडीएमसी अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे.
कल्याण पश्चिमेच्या रौनक सिटी भागात आज सकाळी वीज पुरवठा खंडित झाला होता. तर बराच वेळ लाईट गेल्याने इमारतीचे जनरेटरही काही वेळानंतर बंद पडले. मात्र त्याचवेळी या लिफ्टमध्ये 15 वर्षांची मुलगी सहा महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन चालली होती. परंतु लिफ्ट दहाव्या मजल्यावर असताना अचानक बंद पडली. आणि ही मुलगी आणि तिच्यासोबत असणारे हे चिमुरडे बाळ दोघेही त्यात अडकून पडले. हे दोघे लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच इमारतीमधील रहिवाशांनी त्या दोघांना बाहेर काढण्याचे विविध प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले.
बराच वेळ होऊनही ते दोघे आतमध्ये अडकून पडल्याने रहिवाशांनी अखेर केडीएमसी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि हायड्रोलिक कटरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.