डोंबिवली दि.19 जानेवारी :
बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीत लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली. डोंबिवली पूर्वेच्या सागाव परिसरात घडलेल्या या घटनेची मानपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सत्यम मौर्य असे या 10 वर्षांच्या चिमुरड्याचे नाव आहे. डोंबिवली पुर्वेच्या सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगार विक्रीच्या दुकानात काम करतात. त्यांचा 10 वर्षांचा मुलगा सत्यम हा मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र जवळपास दोन तास झाले तरी सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. घराजवळच्या आसपासच्या परिसरात तासभर शोध घेऊनही सत्यम सापडला नाही. त्यामुळे त्यांनी घराजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरात जाऊन बघितले असता त्यांना एकच धक्का बसला. इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. आणि त्या पाण्यामध्ये सत्यमचा मृतदेह तरंगत असल्याचे बघून संपूर्ण कुटुंब हादरून गेले.
दरम्यान मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि शुभमचा मृतदेह बाहेर काढून महापालिकेच्या रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर सत्यमच्या कुटुंबियांनी दुर्घटनेला जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे.