Home क्राइम वॉच डोंबिवलीवर शोककळा; पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघे जण एकाच कुटुंबाशी निगडीत

डोंबिवलीवर शोककळा; पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले तिघे जण एकाच कुटुंबाशी निगडीत

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम श्रीनगरला दाखल

डोंबिवली दि.23 एप्रिल :
काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन रहिवासी मृत्युमुखी पडले. यातील संजय लक्ष्मण लेले (५२) राहणार विजयश्री अपार्टमेंट,सुभाष रोड, नवापाडा चौक हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम ह्यांचे सख्खे मेहुणे असून यामध्ये मृत्युमुखी पडलेले इतर डोंबिबलीकर हे संजय लेले यांच्या पत्नी कविता यांचे मावस आणि आत्येभाऊ होते.

दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश मोरे हे स्वतः श्रीनगर येथे दाखल झाले आहेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्राच्या इतर भागांसह डोंबिवलीतील पर्यटकांना परत आणण्यासाठी त्यांच्याकडून नियोजन केले जात आहे.

तर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी हे सावित्री बिल्डिंग, भागशाला मैदान आणि अतुल मोने राहणार श्रीराम अंचल, सम्राट चौक हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते.

संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले (२०) हे दहशतवाद्यांची गोळी हाताच्या बोटाला लागून किरकोळ जखमी झाले असून संजय यांची पत्नी कविता, अतुल मोने (४४) यांची पत्नी अनुष्का आणि १६ वर्षाची मुलगी रुचा आणि हेमंत जोशी ( ४३ ) यांची पत्नी मोनिका आणि १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे ६ जण सुखरुप आहेत, परंतु दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ३ डोंबिवलीकर मात्र या भ्याड हल्ल्यात शहिद झाले.

अतिरेक्यांनी 20 वर्षाच्या युवकासमोर वडिलांसह दोन्ही मामांना घातल्या गोळ्या…
या परिस्थितीत कुमार हर्षल लेले हा २० वर्षाच्या युवकाने सर्व गांभिर्य लक्षात येताच आपले दुःख गिळून ह्या तीनही कुटुंबीयांना संभाळून अगदी धीराने आलेल्या संकटाचा सामना करत आहे. त्याच्या समोर त्याचे वडील आणि २ मामा ह्यांना निर्दयी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा, शवागृह, पोस्ट मार्टम या सगळ्या बाबी धीरोधात्त पणे सामोरे जाऊन तो व त्यांचे आई, मावशी व भावंडे अशी कुटुंबीय काश्मीर मध्ये अनोळखी ठिकाणी संकटाशी सामना करत आहे.

भारत सरकार, भारतीय सैन्यदल, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, नागरिक ह्यांची मदत होत आहे त्याच बरोबर या यंत्रणेच्या संपर्कात राहून या कुटुंबीयांना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कालपासूनच त्वरित मदत करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी खासदार डॉ.शिंदे यांचे स्विय सहाय्यक अभिजित दरेकर हे श्रीनगरला पोहचले आहेत.

राजेश कदम यांच्यासह इतर लेले आणि मोने कुटुंबीयही पहाटे श्रीनगरला रवाना झाले असून त्यांच्या सोबत डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांची एक टीमही तेथील पुढील मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. तर खासदार डॉ. शिंदे हे स्वतः या सर्व मदत कार्यावर वैयक्तिक लक्ष ठेऊन आहेत.

आमदार रवींद्र चव्हाण,आमदार राजेश मोरे आणि ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे, कल्याण प्रांत विश्वास गुजर, डीसीपी अतुल झेंडे, कल्याण तहसीलदार, हे देखील ह्या दुर्दैवी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सतत संपर्कात आहेत.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा