Home ठळक बातम्या कल्याणातील सर्वात वर्दळीच्या चौकात फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग

कल्याणातील सर्वात वर्दळीच्या चौकात फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग

महिन्याभराच्या अभ्यासानंतर बसवण्यात येणार कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा

कल्याण दि.17 एप्रिल :
अंतर्गत रस्ते असो की मुख्य, कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी वाहतूक कोंडीची समस्या काही नविन नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड हा प्रमुख मार्ग असून दररोज याठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार आदी प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणाचे मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातही सहजानंद चौकात तर एकाच वेळी पाच ठिकाणांहून वाहनांची ये जा असल्याने इथल्या वाहतुकीचे नियोजन करताना शहर वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता ही सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास पालिकेचा पैसा वाया जाऊ शकतो. शहरातील नागरिकांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी आपण प्रयत्नशील – माजी सभागृह नेते श्रेयस समेळ

सहजानंद चौक हा कल्याणातील एक महत्त्वाचा चौक आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणा असावी यातही आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील होतो. त्या कामाला आता सुरुवात झाली आहे याचे समाधान असून लवकरच याठिकाणी कायम स्वरुपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येईल. याबद्दल केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार

2 कॉमेंट्स

  1. डाँ.गोकुलसिंह गिरासे होमिओपॅथिक कन्सल्टंट / क्रिकेट समालोचक डाँ.गोकुलसिंह गिरासे होमिओपॅथिक कन्सल्टंट / क्रिकेट समालोचक

    नवीन सिग्नल यंत्रणा बसवणे ही खूप चांगली गोष्ट आहे .वेगवेगळे प्रयोग करायला हरकत नाही ,त्यातून चांगला मार्ग नक्कीच सापडत असतो .सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेने जर नियमांचे तंतोतंत पालन केले, तर कुठल्याही प्रकारच्या नवीन सिग्नल यंत्रणेची देखील गरज भासणार नाही. पारंपारिक पद्धतीच्या सिग्नल यंत्रणेद्वारे देखील वाहतूक सुरळीतपणे करता येऊ शकते .सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकं नियमांचे पालन अजिबातच करत नाही ही शोकांतिका आहे.
    अनेक विविध धर्मांच्या उत्सवांच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि म्हणूनच पोलिसांवर त्याचा भार जास्त प्रमाणात येत असतो. आपण सर्व लोक उत्सव साजरा करण्यात मग्न असतो आणि विचारे पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात मग्न असतात .जनतेने जर नियमांचे तंतोतंत पालन केले, तर कुठल्याही उत्सवाच्या दिवशी देखील पोलिसांना एवढ्या प्रचंड प्रमाणात ड्युटी करण्याची गरज भासणार नाही. नियमितपणे ड्युटी ज्यांच्या असतील तेवढेच लोक कामावर येतील, पण उत्सवाच्या वेळेस उलट जास्त प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. सुरळीत वाहतुकीसाठी देखील जास्त प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात येत असते. हे चित्र बदलायला हवे.
    आपण आपल्या सणांच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करत असतो आणि पोलीस मात्र आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करू शकत नाहीत, ते देखील केवळ जनतेच्या नियमबाह्य वागण्यामुळे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा