Home ठळक बातम्या वक्फ विधेयकाला विरोध करुन त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना चिरडले – शिवसेना खासदार डॉ....

वक्फ विधेयकाला विरोध करुन त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना चिरडले – शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

Oplus_131072

(फाईल फोटो)

नवी दिल्ली दि.2 एप्रिल :
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे समर्थन करुन बाळासाहेबांचे विचार जपण्याची आणि हिंदुत्व सोडण्याची केलेली चूक सुधारण्याची त्यांना संधी होती. मात्र या विधेयकाला विरोध करुन बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी चिरडून टाकले, अशा शब्दांत शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर हल्लाबोल केला. त्यांना आतापर्यंत हिंदुत्वाची एलर्जी होती आता हिंदुंचीही एलर्जी झाली, अशी खरमरीत टीका त्यांनी संसदेत बोलताना केली. लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला सर्मथन देताना खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना वेदना झाल्या. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर संसदेत त्यांनी हे भाषण केले असते का, असा प्रश्न उबाठाच्या खासदारांनी अंतरात्म्याला प्रश्न विचारायला हवा असा टोला लगावत या विधेयकाला विरोध करुन ते कोणाच्या विचारांवर चालत आहेत, हे आज स्पष्ट झाल्याची खरमरीत टीकाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

हिंदुत्वाचे रक्षण आणि देशाचे एकात्मता आणि इतर धर्मीयांचा सन्मान असे बाळासाहेबांचे स्पष्ट विचार होते. मात्र आज बाळासाहेबांनी उबाठाची मते ऐकली असती तर त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. उबाठाने वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांच्या मुद्याला विरोध केला आहे. मुस्लिम शासकांच्या मालमत्तांचे संरक्षण करावे यासाठी उबाठा गटाने पत्रे लिहली आहेत, यावरुन ते औरंगजेबाच्या विचारांनी चालत आहेत. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करुन मारले त्याची भलामण करण्याची नामुष्की उबाठावर ओढवल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. काश्मिरमधून कलम ३७० हटवणे, अयोध्येत राममंदीर उभारण्याचे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिले होते. मात्र त्याबाबत प्रश्न विचारण्याची नामुष्की उबाठा खासदारावर आली. काँग्रेस खासदार गौरव गौगई यांनी भाषणात स्वातंत्र्यवीर सावकर यांचा अवमान केला, त्यावर उबाठावाले जाब विचारणार का असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी केला.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे नाव उम्मीद करण्यात आले आहे. या देशातील गरिब मुस्लिमांच्या कल्याणाचे काम हे विधेयक करणार आहे. आजपर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्षाने मुस्लिम मतांचे राजकारण केले. लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार असा फेक नरेटिव्ह चालवला होता. आज ते लोक वक्फ विधेयकाबाबत गैरसमज पसरवत आहेत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

तर शाहबानोला कोर्टाने न्याय दिला होता, मात्र काँग्रेसचे सरकार असताना याच सभागृहाने शाहबानोला न्याय नाकारण्यात आला. जम्मू काश्मिरच्या जनतेने कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली तेव्हा काँग्रेसने बघ्याची भूमिका घेतली होती. वर्ष २००६ मध्ये सच्चर आयोगाने अहवाल सादर केला तेव्हा काँग्रेस सरकारने ८ वर्ष तो केराच्या टोपलीत ठेवला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने ३७० कलम रद्द केला, तिहेरी तलाक कायदा लागू केला आणि आज ऐतिहासिक वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे. हे मतांसाठी नाही तर देशासाठी केलेल काम आहे, असे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच या विधेयकाला इंडी आघाडीचे सर्व पक्ष विरोध करत आहेत. मात्र वक्फ बोर्डाच्या भ्रष्टाचारावर चौकशी लावण्याची हिंमत इंडि आघाडीतील एकाही मुख्यमंत्र्यांने दाखवली नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. २०११ मध्ये पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने १००० कोटींच्या वक्फ बोर्डाच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या केंद्र सरकारकडे केली होती. २०१९ मध्ये काँग्रेसने दिल्लीतील आम आदमी सरकारविरोधात तक्रार केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री आझम खान वक्फ मंत्री असताना वक्फच्या नावाखाली जमीनींची लूटमार केली. आज ५० हून अधिक गुन्हे दाखल झाले आणि ते तुरुंगात आहे. तेलंगणात ७७ हजार एकरपैकी ५५ हजार एकर जमीनीबाबत खटले सुरु आहेत. केरळात देखील अशीच परिस्थिती आहे. वक्फच्या नावाखाली केलेली पापं आता उजेडात येणार आहेत त्यामुळे विरोधक या विधेयकाला विरोध करत आहेत, असे खासदार शिंदे म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा