
उद्घाटन होण्यापूर्वी होर्डींग हटवा अन्यथा आम्ही तोडून टाकू काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांची मागणी
कल्याण दि.22 मार्च :
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडीकिनारी केली. शिवरायांच्या या द्रष्टेपणाची नव्या पिढीला ओळख होण्याच्या उद्देशाने कल्याणच्या याच खाडीकिनारी भव्य “नौदल संग्रहालयाचे” (NAVAL MUSEUM) सुरू असलेले काम आता अंतिम टप्प्यात आले. मात्र याचशेजारी उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे नौदल संग्रहालयाचे केवळ विद्रुपीकरणच होत नाहीये, तर घाटकोपरसारखी होर्डिंग दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नौदल संग्रहालयाचे उद्घाटन होण्यापूर्वी हे अजस्त्र होर्डिंग इथून हटवण्याची मागणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता असून हे होर्डिंग उद्घाटनापूर्वी हटवले नाही तर आम्हीच ते तोडून टाकू अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केली आहे. (Huge Hoarding Near Chhatrapati Shivaji Maharaj Naval Museum : Fear of Ghatkopar-like disaster along with disfigurement of the area)
तत्कालीन ऐतिहासिक काळात कल्याणच्या खाडीचे असलेले सामरीक आणि भौगोलिक महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली. याचठिकाणी महाराजांच्या या दूरदृष्टीला आणि शौर्याला साजेसे एखादे स्मारक उभारण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती.
आणि या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा नितांत आदर आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यांनी भारतीय नौदलाच्या मदतीने आधुनिक नौदल संग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच ती पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती शासकीय कार्यवाहीही डॉ. सूर्यवंशी यांनी लक्षपूर्वक पूर्ण केली. ज्याची फलश्रुती म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यात त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पाणबुडीच्या आकाराच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात येत आहे.
मात्र एकीकडे या नौदल संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना दुसरीकडे याचशेजारी अतिशय अजस्त्र असे भलेमोठे होर्डिंग उभे राहिले आहे. ज्यामुळे या नौदल संग्रहालय आणि परिसराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण होत आहे. एकीकडे दुर्गा देवीचे मंदिर, त्याच्या पायथ्याशी उभी असलेली टी 80 युद्धनौका, या युद्ध नौकेसमोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि या तिन्ही महत्त्वाच्या वास्तूंच्या सानिध्यात उभे राहत असलेले हे नौदल संग्रहालय. अशी या संपूर्ण परिसराची भौगोलिक स्थिती पाहता नौदल संग्रहालयाशेजारी असणारे अजस्त्र होर्डिंग म्हणजे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूवरील काळा डाग दिसत आहे. तसेच या अवाढव्य होर्डिंगखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संग्रहालय झाकोळून जाणार आहे. परिणामी हे होर्डिंग इथून हटवण्याची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता, होर्डिंग हटवा अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू – काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे
छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेले कल्याणातील पहिले आरमार हे आमच्यासह सर्वच शिवप्रेमींसाठी स्वाभिमान आणि आमचा अभिमान आहे. या आरमाराच्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या नौदल संग्रहालयासाठीही आमच्या मनामध्ये नितांत आदर असून त्याची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही. एकीकडे शिवसेनेचे नेते सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि दुसरीकडे त्यांच्याच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अशा पद्धतीने विटंबना करायची ही एकप्रकारे दुतोंडी भूमिका आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रीतसर हे अवाढव्य होर्डिंग स्वतःहून तिकडून हटवावे, अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू असा संतापवजा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी एलएनएनशी बोलताना दिला.
दरम्यान यासंदर्भात आता केडीएमसी प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.