
डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महारांजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
डोंबिवली दि.18 मार्च :
औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज एक दैवी शक्ती होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रुरता दाखवली. या औरंगजेबाचे गोडवे काही लोक गातात. हे गोडवे गाणारे देशद्रोहीच आहेत, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. डोंबिवली पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. हीच छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते. (Those who sing the praises of Aurangzeb are traitors – Deputy Chief Minister Eknath Shinde’s attack)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील घारडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी हजारो डोंबिवलीकरांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यासाठी दुपारपासूनच अबाल वृद्धांनी घारडा चौकात गर्दी केली होती. यावेळी हा चौक यापुढे घारडा सर्कल नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती. लोकशाहीचा अविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दृरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे निती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरूष, शिवछत्रपती म्हणजे प्रवर्तक, शिवछत्रपती म्हणजे रयतेचा राजा अशा शब्दात शिंदे यांनी महाराजांची थोरवी गायली. या पुतळ्याची रचना वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जनतेला दर्शन देताना या पुतळ्यात दिसतात असे सांगत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंद केले. हा पुतळा पुढील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देत राहिल. तरूण पिढी, मुलांना उर्जा देत राहील. डोंबिवलीकर शिवभक्तांना या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. विकासाला पुढे नेणारे, लोकाभिमुख योजना राबवणारे हे सरकार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले. औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रुरता दाखवली. त्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे यावेळी शिंदे म्हणाले. प्रत्येकाने महारांजांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगिकारला पाहिजे. हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
या भागाची आता छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ओळख…
हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ” असे केवळ कानी जरी पडले तरी एक नवचैतन्य निर्माण होते आणि प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा अंगी बाळगत शिवजयंतीच्या निमित्ताने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य सोहळा पार पडला. गेले अनेक वर्ष घारडा सर्कल अशी ओळख असलेल्या भागाची आता ” छत्रपती शिवाजी महाराज चौक ” अशी एक ओळख निर्माण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते या प्रेरणादायी शिल्पाचे अनावरण करण्यात आले. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक काव्य सादर करत त्यांच्या पराक्रमाची थोरवी गायली, ज्याला उपस्थित शिवप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
यावेळी हिंदुराष्ट्र सेनाप्रमुख धनंजयभाई देसाई, समाजप्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे महाराज, जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, गोपाळ लांडगे, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह हजारो डोंबिवलीकर, शिवभक्त, शिवसेनेने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.