
भीषण आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
कल्याण दि.11 मार्च :
कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हिल परिसरातील झुलेलाल चौकात असलेल्या रिव्हर डेल विस्टा या बहुमजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या इमारतीमधील 14 व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला ही आग लागली ज्यामध्ये हा फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. (Fire in multi-storey building brought under control after two hours; However, 2 flats burnt down in the massive fire)
आज रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास या बहूमजली इमारतीमधील 14 व्या मजल्यावर आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. मात्र अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घरभर ही आग पसरली. तर आग लागल्याचे समजताच घरातील काही सदस्य तातडीने घराबाहेर पडल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तर आगीची माहिती समजताच खबरदारीचा उपाय म्हणून ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. आणि वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला. तर या आगीची झळ ही आग लागलेल्या 14 व्या मजल्यावरील या फ्लॅटखालील म्हणजे 13व्या मजल्यावरील फ्लॅटलाही बसली. या 13 व्या मजल्यावरील फ्लॅटमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू वितळून गेल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच काही मिनिटातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तब्बल पावणे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र त्यानंतरही अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम केले जात होते.
या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी कल्याणात 10 ते 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बहुमजली इमारती आणि त्यातील अग्निशमन यंत्रणांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या बहुमजली इमारतीमध्येही अशाच प्रकारे भीषण आगीची घटना घडली होती. त्यानंतरही आगीच्या घटना या सुरूच असून जुन्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याची गरज गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.