
कल्याण दि.7 मार्च :
छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरसह मुंबईच्या भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्याविरोधात आज कल्याणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच या तिघांनाही त्वरित अटक करण्याची मागणी करत तिघांचाही तीव्र शब्दांत यावेळी निषेध करण्यात आला.
आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब जोशी यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याचे वक्तव्य केले. त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. राज्याच्या विधिमंडळासह आता रस्त्या रस्त्यांवरही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.
कल्याणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे, साईनाथ तारे आदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले. भैय्या जोशी हाय हाय, राहुल सोलापूरकर हाय हाय, प्रशांत कोरटकर हाय हाय च्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
तर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैय्या जोशी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचा अपमान आहे. या संतापजनक वक्तव्याची राज्य शासनाने तातडीनं दखल घेऊन भैय्या जोशी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनाही तातडीने अटक करण्याची आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय साळवी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.