
मुंबई दि.5 मार्च :
आमदार अबू आझमीने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही उमटले असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर अबू आझमीविरोधात आंदोलन छेडत आंदोलन केले. यामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले. (Abu Azmi’s statement, rulling parties MLAs protesting against it)
आमदार अबू आझमीकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या वक्तव्यानंतर महाराष्टातील तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केवळ शिवप्रेमीच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही या वक्तव्याचा निषेध करत हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि त्यांच्या शौर्याचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.
त्यामुळे साहजिकच नुकत्याच सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अबू आझमी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले.
येथील विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी एकत्र येत अबू आझमीच्या वक्तव्याचा निषेध केला. अबू आझमीचे हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असून “ही तर औरंग्याची पिल्लावळ, ठेचून टाकू त्याची वळवळ” अशा आशयाचे बॅनर घेऊन हे सत्ताधारी आमदार या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर आंदोलन करणाऱ्या या आमदारांनी अबू आजमीची प्रतिमा असलेला बॅनर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवली शहरात देखील कार्यकर्त्यांना इंदिरा चौकात अबू आझमीविरोधात जोडे मारो आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. यानुसार डोंबिवलीतही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलेलं पाहायला मिळाले.