Home ठळक बातम्या महापालिका निवडणुका घेण्याच्या मागणीसह शहरातील दुरावस्थेविरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

महापालिका निवडणुका घेण्याच्या मागणीसह शहरातील दुरावस्थेविरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

केडीएमसी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी

कल्याण दि.4 मार्च :
कार्यकाळ उलटूनही अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याबद्दल आणि शहरातील दुरावस्थेविरोधात कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केडीएमसी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली गेली. (Kalyan District Congress protests against the remoteness of the city, demanding holding of municipal elections)

2015 नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही. तत्कालीन निवडणुकीत निवडल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपूनही आता 5 वर्षे उलटली आहेत. परिणामी कल्याण डोंबिवलीमध्ये नागरी समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. तसेच शहरांमध्ये अस्वच्छता, अनारोग्य, शिक्षण आणि वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. शहराच्या या सर्व समस्या दिवसागणिक गंभीर होत चालल्या असताना केडीएमसी प्रशासन मात्र ढीम्मपणे एसी केबिनमध्ये बसून असल्याचा गंभीर आरोपही यावेळी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. तर 65 अनधिकृत इमारतींवरील कारवाईमध्ये त्यातील सामान्य नागरिक विनाकारण भरडले जात असून प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या शेकडो लोकांचे संसार आज रस्त्यावर आल्याचेही जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सर्व गोष्टींचा विचार करता केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रशासनातील एकाही भ्रष्ट अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी न घालता त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणीही यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
दरम्यान कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह वरिष्ठ नेते राजाभाऊ पातकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, माजी नगरसेवक नविन सिंग, यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा