Home ठळक बातम्या जय भवानी जय शिवराय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केडीएमसीच्या पदयात्रेला...

जय भवानी जय शिवराय : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केडीएमसीच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.19 फेब्रुवारी :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती. त्यानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जय भवानी जय शिवाजीचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषात संपूर्ण कल्याण नगरी दुमदुमून गेलेली पहायला मिळाली. (Jai Bhawani Jai Shivaji : Spontaneous response to KDMC’s Padayatra organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्याजवळील उर्दू हायस्कूलपासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. तिथून ही पदयात्रा दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौकमार्गे आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला. कल्याण पश्चिमेच्या अनेक शाळा आणि त्यातील विद्यार्थी अतिशय मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाबाई यांसह मावळ्यांच्या वेषांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी या पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

कल्याण नगरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही नगरी पवित्र झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, बुद्धीमत्ता, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य यांची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली. तर शिवरायांनी पहिल्या नौदल आरामाराची स्थापना ही कल्याणच्या खाडी किनाऱ्यावर केली होती. त्याची आठवण जपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून नौदल संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे. पुढील महिन्यात हे नौदल संग्रहालय लोकांसाठी खुले होईल असा विश्वासही आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी व्यक्त केला.

या पदयात्रेमध्ये आमदार सुलभा गायकवाड, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, उद्योजक मच्छिंद्र जाधव, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, संदीप तांबे, शिक्षण विभागाचे अधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आचार्य अत्रे रंगमंदिरात शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित संस्कृतिक कार्यक्रमामध्ये एकाहून एक सरस सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा