![FB_IMG_1739367992781](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2025/02/FB_IMG_1739367992781-640x427.jpg)
माघी पौर्णिमेनिमित्त मलंग गडावर दर्शन घेत केली आरतीही
मलंगगड दि. 12 फेब्रुवारी :
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1982 पासून श्री मलंगगड यात्रेची परंपरा सुरू केली आहे. आम्हाला न्यायालयावर, न्यायदेवतेवर विश्वास असून कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याप्रमाणे मलंग गडाचाही निर्णय लवकर लागेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आजच्या माघी पौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे यांनी मलंगगड येथील मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत आरतीही केली. (Faith in Justice, like Durgadi, Malang Fort will also get its verdict soon – Deputy Chief Minister Eknath Shinde)
मलंग गड हे मच्छिंद्रनाथांचे स्थान असून दरवर्षी माघी पौर्णिमेनिमित्त याठिकाणी आल्यानंतर एक वेगळी अनुभूती येते. इथे हजारो लाखो मच्छिंद्रनाथाचे नवनाथांचे भक्त येतात, मनोभावे सेवा पूजा करतात. न्यायालयाकडे आवश्यक तो सर्वकाही पाठपुरावा सुरू आहे आणि जसा दुर्गाडीचा निर्णय झाला असाच निर्णय यायचा असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने फडकवला. असे महान योद्धा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदेसारख्या कार्यकर्त्याला मिळाला. आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचे आपल्याला समाधान असल्याची भावनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार? जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवला आहे त्यातून त्यांनी आत्मचिंतन करावं अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तसेच कल्याण, डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.