![Oplus_131072](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2025/02/IMG_20250211_190338-640x298.jpg)
मध्यमवर्गाला खूश करणाऱ्या बजेटमुळे विरोधी पक्ष चेकमेट
नवी दिल्ली दि.११ फेब्रुवारी :
काँग्रेस पक्ष हा राजकारणातला भस्मासूर आहे. काँग्रेसने ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते भस्म झाले, असा घणाघात शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडली. मध्यमवर्गाला खूश करणारा बजेट सादर करुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोध पक्षाला चेकमेट केले, अशा शब्दांत खासदार डॉ. शिंदे यांनी बजेटचे कौतुक केले. (congress is bhasmasura of politics shivsena Mp Dr shrikant shinde criticizes)
काँग्रेसच्या भस्मासूराने ‘यूबीटी’ची मशाल विझवून टाकली…
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या भस्मासूराने महाराष्ट्रात ‘यूबीटी’ची मशाल विझवून टाकली तर घडाळ्याची स्थिती बिकट केली, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. ज्यांनी हिंदुत्व सोडले आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्याची काय अवस्था झाली हे महाराष्ट्रात निवडणुकीतून दिसून आले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला. राहुल गांधी यांनी चीनच्या प्रवक्त्यांप्रमाणे भाषण केले. मेक इन इंडियांला शिव्या देणारे केवळ सरकारलाच नाही तर देशातील प्रत्येक कामगार, अभियंता, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यांना ते शिव्या देतात. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच मेक इन इंडिया यशस्वी झाले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात बँकांची अवस्था बिकट झाली आणि ‘यूपीए’ कमी आणि ‘एनपीए’ची जास्त चर्चा झाली. बँकांना लुटण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. मात्र या सर्व बँकांना ‘एनडीए’ सरकारने १० वर्षात एनपीएच्या दृष्टचक्रातून बाहेर काढले.
…यंदाच्या बजेटने विरोधी पक्षांची बोलती बंद
ते पुढे म्हणाले की, इंडि आघाडीत काँग्रेस हा एक असा बॅट्समन आहे जो आघाडीतील इतरांना रनआऊट करत आहे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला. यंदाच्या बजेटने विरोधी पक्षांची बोलती बंद केली. ‘एनडीए’ सरकार स्कीम्ससाठी ओळखली जाते तर काँग्रेस सरकार स्कॅम्ससाठी कुप्रसिद्ध होते. ते म्हणाले की, २०१४ मध्ये काँग्रेसने भारताला अधु अर्थव्यवस्था दिली होती. त्यावेळी भारताचं बजेट १७ लाख ९४ हजार कोटींचे होते. आज भारताचे बजेट ५० लाख ६४ हजार कोटींचे आहे. ज्यात ३९ लाख ४४ हजार कोटींचा महसुली खर्च आणि ११ लाख २१ हजार कोटींचा भांडवली खर्चाचा समावेश आहे. ‘एनडीए’च्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनली, असे ते म्हणाले.
गेल्या 10 वर्षातील केंद्र सरकारच्या कामांचे कौतुक…
मागील १० वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामांचा यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, भारतात केवळ ७४ एअरपोर्ट होते आज ही संख्या १९७ वर पोहोचली आहे. २०१४ मध्ये देशात ६ कोटी ब्रॉडबँड कनेक्शन होती आज ही संख्या ९४ कोटींवर गेली आहे. कोळसा उत्पादन ५६ मेट्रिक टन होते आज ९९७ मेट्रिक टन इतका वाढला आहे. संरक्षण बजेट २ लाख २४ हजार कोटी होते आज संरक्षण बजेट ६ लाख ८१ हजार कोटी इतका वाढला. ‘एफडीआय’ ३०५ बिलियन डॉलर्स होता तो आज ६० दरडोई उत्पन्न ‘जीडीपी’मध्ये ३५०० डॉलर होते ते आज ६००० डॉलर्सपर्यंत वाढले आहे. आज देशात १.५ लाख किमीचे महामार्ग आहेत. ‘इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये भारत आज ३९ स्थानी आहे.
कर्नाटक राज्यात काँग्रेसने पाच गॅरंटी देऊन सत्ता मिळवली मात्र आज कर्नाटक सरकारला ४८००० कोटींचे कर्ज घ्यावे लागले. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारला १५० कोटी न भरल्याने त्यांचे दिल्लीत हिमाचल भवन जप्त झाले. तेलंगणात काँग्रेस सरकारने १० महिन्यात ५० हजार कोटींचे कर्ज घेतले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने कोरोना काळात खिचडी घोटाळा, ब़ॉडीबॅग घोटाळा केले. त्यांचे मंत्री खंडणी वसुलीमुळे तुरुंगात गेले होते, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.
समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचे काम…
ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचे काम बजेटने केले. या बजेटने दोन रेकॉर्ड केले आहेत. ‘एनडीए’चा हा सलग ११ वा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन या पहिल्या अर्थमंत्री आहेत ज्यांनी सलग ८ वा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यापूर्वी संरक्षण मंत्री देखील होत्या. त्यांच्या कार्यकाळात देश समृद्ध आणि सुरक्षित राहिला, असे उद्गार डॉ. शिंदे यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर टिम इंडियाचे कर्णधार असतील तर सीतारामन या संघाला विजय मिळवून देणाऱ्या अष्टपैलु खेळाडू आहेत, असे कौतुकोद्वार डॉ. शिंदे यांनी काढले.