![IMG-20250210-WA0013](https://www.localnewsnetwork.in/wp-content/uploads/2025/02/IMG-20250210-WA0013-640x295.jpg)
गांधारी – वडवली रस्त्याचे काम लवकरच होणार सुरू
कल्याण दि.10 फेब्रुवारी :
कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा रिंग रोड (बाह्यवळण) प्रकल्पाच्या कामाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील टप्पा क्रमांक 5 अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. गांधारी – वडवली – अटाळी या मार्गामधील बाधीत 118 बांधकामे हटवण्यास आजपासून केडीएमसीने प्रारंभ केला आहे. (Ambitious Ring Road Project; Removal of 118 constructions started in Atali area )
कल्याण डोंबिवलीतील वाहतुकीच्या दृष्टीने गेमचेंजर असलेल्या या महत्त्वाकांक्षी रिंग रोड (बाह्य वळण) प्रकल्पाचे काम आठ टप्प्यांमध्ये केले जात आहे. यातील टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रीज ते गांधारे ब्रीज), टप्पा – ५ (गांधारी ब्रीज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर रस्ता नागरिकांच्या सेवेत आला आहे. टप्पा – ३ (मोठा गाव ब्रीज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. तर टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.
यापैकी टप्पा क्रमांक ५ (गांधारी ब्रीज ते मांडा जंक्शन) मध्ये गांधारी ते वडवलीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्यापुढील वडवली ते अटाळी या पट्ट्याचे काम भूसंपादन आणि पुनर्वसनाअभावी रखडले होते. मात्र यातील हे दोन्ही प्रमुख अडथळे आता दूर झाले असून यामध्ये बाधीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही बहुतांशी निकाली निघाला आहे. त्यामुळे या मार्गामध्ये येणाऱ्या 319 खोल्या यापूर्वीच तोडण्यात आल्या असून आज सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडून 118 खोल्या तोडण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती परिमंडळ 1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे. पुढील 2-3 दिवस अखंडपणे ही कारवाई केली जाणार असून त्यामुळे रिंग रोड प्रकल्पातील वडवली – अटाळी हा पट्टा लवकरच एकमेकांशी जोडला जाणार असल्याचेही बोरकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पातील वडवली – अटाळी हा मार्ग जोडला गेल्यास कल्याणहून टिटवाळा गाठणे आणखीनच सोपे होणार आहे.