येत्या 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत राहणार वाहतूक बदल
कल्याण – डोंबिवली दि.31 जानेवारी :
नवी मुंबईसह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या कल्याण शीळ मार्गावरील वाहतूकीत पुढील आठवड्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी रेल्वेचा डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी 2025 पासून रात्री १२ ते 10 फेब्रुवारी 2025 च्या रात्री 12. वाजेपर्यंत असे पाच दिवस या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.(Railway’s Dedicated Freight Corridor Project: Major changes in traffic on Kalyan-Shil road for flyover work)
सध्या रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपेरिया माॅलजवळील निळजे रेल्वे उड्डाण पुलाखालून जाणार असून या पुलाच्या दोन्ही बाजूला पृष्ठभागालगत भरावाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निळजे रेल्वे मार्गावरील या उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
त्यासाठी पुढील आठवड्यात पाच दिवस पलावा जंक्शनकडे येणारी वाहतूक पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मार्गावर हलक्या, जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
त्याऐवजी प्रवाशांनी डोंबिवलीतील मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा आणि शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथून डावीकडे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहेत.
तर बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजामार्गे पनवेल, नवी मुंबईकडे जाता येणार आहे.
तसेच हलक्या, मध्यम वाहनांना काटई गाव कमान येथून लोढा पलावाच्या दिशेने विरुध्द मार्गिकेतून जाता येईल आणि पलावा जंक्शन येथे नेहमीप्रमाणे पुढे जाता येईल अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.