केडीएमसी विद्युत विभाग पालिकेच्या 61 शाळांमध्ये बसवणार 500 कॅमेरे
कल्याण डोंबिवली दि.22 जानेवारी :
सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा लक्षात घेता केडीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवलीतील 61 शाळांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार असून सीसीटीव्ही बसविण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे. (Watch of “CCTV” cameras for the safety of students in KDMC schools)
पुढील महिन्याभरात कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होणार…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विषय सध्या सर्वत्र कळीचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभुमीवर 21/ 8 /2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले असून पुढील महिन्याभरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.
मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार ही जबाबदारी…
तसेच शासन निर्णयानुसार शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी करून त्यात काही आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमधील काही चुकीचे आढळून आल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याची जबाबदारीही मुख्याध्यापकांची असेल असे केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
61 शाळांमध्ये बसवण्यात येणार तब्बल 502 कॅमेरे…
तर महापालिकेच्या एकूण 61 शाळांमध्ये विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांचे सुरक्षिततेकरिता एकूण 502 कॅमेरे बसविण्यात येणार असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांचे कक्षेत सीसीटीव्ही मॉनिटर बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.