तब्बल 7 हजार स्क्वेअर फूट जागेवर करण्यात आलीय रिहॅब सेंटरची निर्मिती
कल्याण दि.18 जानेवारी :
तब्बल ७ हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये उभारण्यात आलेले फिजीओथेरेपी पुर्नवसन केंद्र दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान ठरेल अशा शब्दांत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसीला कौतुकाची थाप दिली. केडीएमसी आणि आधार संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या रिहॅब सेंटरचे खा.डॉ. शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कल्याणसह आसपासच्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी किंवा इतर उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्चिक उपचार करावे लागतात. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या माध्यमातून हे अनोखे केंद्र उभारण्यात आले आहे. या फिजीओथेरेपी पुर्नवसन केंद्रात महापालिकेकडे नोंदणीकृत अंधत्व, बुटकेपणा, मतिमंद, स्नायु दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, स्वमग्नता ,अध्ययन अक्षमता, थैलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, वाचादोष, बहुविकलांगता, कर्णबधिरता हिमोफिलीया, लोकोमोटर डिसॅबिलीटी आजारांशी संबंधित दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क उपचार दिले जाणार आहेत. तर महापालिकेकडे नोंदणीकृत नसतील अशा दिव्यांगाना आणि महापालिका क्षेत्राबाहेरील दिव्यांग व्यक्तींना 500 रुपयांमध्ये विविध उपचारांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली.
यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, कल्याण पश्चिम शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, कल्याण पूर्व शहरप्रमुख निलेश शिंदे, ठाणे जिल्हा दिव्यांग आयकॉन अशोक भोईर, परिमंडळ -3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव ,कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह माजी पदाधिकारी, सदस्य आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.