Home ठळक बातम्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

डोंबिवली दि.12 जानेवारी :
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून येणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही नियुक्ती केली असून भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. (MLA Ravindra Chavan has been appointed as the Maharashtra State Executive President of BJP)

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. या आधीच्या महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाची धुरा समर्थपणे सांभाळलेल्या चव्हाण यांच्यावर आता पक्षश्रेष्ठींनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. दांडगा जनसंपर्क, उत्तम संघटन कौशल्य आणि परिणामकारक नियोजन ही रविंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन – रविंद्र चव्हाण

दरम्यान पक्षश्रेष्ठींनी सोपवलेल्या या नव्या जबाबदारीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा आपल्या भारतीय जनता पार्टी परिवाराचा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने आजवर ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या, त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर ही जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशा शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा