Home क्राइम वॉच गुड न्यूज : चोरीला गेलेला तब्बल दिड कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून नागरिकांना परत

गुड न्यूज : चोरीला गेलेला तब्बल दिड कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून नागरिकांना परत

चोरीला गेलेल्या वाहने, मोबाईल, सोन्याच्या दागिन्यांचा समावेश

कल्याण दि.8 जानेवारी :
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीसांच्या कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत चोरीला गेलेला तब्बल दिड कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून नागरिकांना परत करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील साईनंदन सभागृहात ठाण्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र पोलीस दल स्थापन होऊन 2 जानेवारी 2025 रोजी 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पुढील संपूर्ण आठवडा हा राज्यभरात पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस उपायुक्त कल्याण परिमंडळ 3 मध्येही त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक आणि महत्त्वपूर्ण असलेला सोहळा म्हणजे नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करणे.

त्याचाच एक भाग म्हणून कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यातील 162 गुन्ह्यांतील मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलिसांकडून परत करण्यात आला. ज्यामध्ये वाहने, मोबाईल. सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे सर्व मिळून तब्बल 1 कोटी 43 लाख 37 हजार किमतीच्या वस्तू होत्या. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते संबंधित व्यक्तींना हा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत देण्यात आला. आपल्या हरवलेल्या वस्तू, पैसे आदी मुद्देमाल परत मिळाल्याचा मोठा आनंद या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता.

येत्या काळात महिला अत्याचार, मुलांवरील, ड्रग्ज आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील. यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि इतर वर्गासोबत वाढत चाललेल्या डिजिटल अरेस्टचे गुन्हे रोखण्यासाठीही उपाय योजना करणार असल्याची माहिती डॉ. सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी यावेळी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा