बी.के. बिर्ला महाविद्यालयातील 16 व्या आदिवासी युवा – आदान प्रदान कार्यक्रमाला प्रारंभ
कल्याण दि.6 जानेवारी :
गेल्या 7 वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने देशातील आदिवासीबहुल राज्यांमध्ये भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मितीही केली आहे. त्यामुळे येत्या काळात इथली युवा पिढी नक्कीच देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जाईल असा विश्वास केंद्रीय गृहखात्याचे संचालक योगेश मोहन दिक्षीत यांनी कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयात व्यक्त केला. (Creation of massive infrastructure facilities by the Center for the development of tribals – Central Home Director Yogesh Dixit)
केंद्रीय गृह विभाग, युवा कार्यक्रम – क्रिडा मंत्रालय, मेरा युवा भारत, नेहरू युवा केंद्र, बी. के. बिर्ला कॉलेज – आचिव्हर्स कॉलेज आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16 व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत छत्तीसगड, उडीसा, झारखंड राज्यातील आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे कल्याणात दाखल झाले आहेत.
गेल्या 7 वर्षांमध्ये केंद्र सरकारने छत्तीसगड, उडीसा, झारखंड या आदिवासीबहुल राज्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. इथल्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक आणि परिणामकारक प्रयत्न केले जात असल्याचे गृह संचालक योगेश दिक्षीत यांनी यावेळी सांगितले. तर या आदान प्रदान कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींचा लाभ घ्यावा आणि मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहनही दिक्षीत यांनी यावेळी केले.
तुम्ही देशाची भावी पिढी, देशाचे नाव मोठे करा – डॉ.नरेशचंद्र…
आपल्याकडे असणाऱ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये देशाची निर्मिती होत असते, याठिकाणीच खऱ्या अर्थाने देश घडत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही असे काही करा की ज्यामुळे देशाचे नावही मोठे होईल आणि तुमचाही सन्मान वाढेल अशा शब्दांमध्ये बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्रा यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच तुमच्या उज्वल भविष्यासाठी, तुमच्या प्रगतीसाठी जे जे काही शक्य असेल त्या सर्व गोष्टी बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि इतर सामाजिक संस्थांकडून केल्या जातील असेही डॉ. नरेश चंद्र यांनी यावेळी आश्वस्त केले.
मेहनतीला – पराभवाला अजिबात घाबरु नका – इंद्राणी यादव…
आयुष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे याचे ध्येय एकदा निश्चित करा. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी मेहनतीला किंवा जीवनात येणाऱ्या पराभवाला अजिबात घाबरु नका असे आवाहन यावेळी सीआरपीएफच्या पश्चिम विभाग,मुंबईच्या कमांडंट इंद्राणी यादव यांनी या विद्यार्थ्यांना केले. तर आयुष्यात तुम्हाला पुढे जायचे असेल तर मेहनत आणि कष्टाला कोणताही पर्याय नाहीये. तर जातीभेद, गरीब श्रीमंत, महिला पुरुष, लहान मोठे अशा कोणत्याही भेदभावाला तुम्ही अजिबात घाबरु नका असे सांगत इंद्राणी यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची दिशा दाखवली.
कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जा – संजय जाधव
आदिवासी समाजाच्या,विद्यार्थ्यांच्या यातना आपण खूप जवळून पाहिल्या आहेत. आपले लहानपण हे पालघरसारख्या आदिवासीबहुल भागात गेले असून लोकांचे टक्के टोमणे खात इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यापासून पळून जाऊ नका तिला सामोरे जा विजय तुमचाच असेल अशा शब्दांत केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच आदिवासी भागातील साधा विद्यार्थी ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उपायुक्त या संघर्षमयी यशस्वी जीवनाचे इप्सित कसे साध्य केले याचीही जाधव यांनी यावेळी थोडक्यात माहिती दिली.
छत्तीसगड, उडीसा, झारखंड राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे या आदान प्रदान कार्यक्रमानिमित्त कल्याणात दाखल झाले आहेत. पुढील 11 जानेवारीपर्यंत हे विद्यार्थी इकडे थांबणार असून इथल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांनाही हे विद्यार्थी भेट देणार आहेत. ज्याद्वारे या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहाची तोंडओळख होण्यासह त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष उपक्रमाअंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
यावेळी कल्याणात दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आपापल्या भागातील पारंपरिक नृत्याचे शानदार सादरीकरण केले. ज्याला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्रचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, हरिश्चंद्र सिंह, समाजसेवक विजय पंडीत, माजी आमदार नरेंद्र पवार, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश पाटील, आचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश भिवंडीकर, बिर्ला नाईट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरीश दुबे, डी. बी. ग्रुपचे मच्छिंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.