Home ठळक बातम्या धुळमुक्त होताहेत रस्ते : रस्त्यावरील धुळीविरोधात केडीएमसीचे “ऑपरेशन ऑल आऊट”

धुळमुक्त होताहेत रस्ते : रस्त्यावरील धुळीविरोधात केडीएमसीचे “ऑपरेशन ऑल आऊट”

महिन्याभरापासून रात्रीच्या वेळी सुरू आहे विशेष मोहीम

कल्याण डोंबिवली दि.27 डिसेंबर :
रस्त्यावरील धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी केडीएमसीने आता कंबर कसलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीच्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर केडीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. ज्याद्वारे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात धूळ साफ करण्यात आल्याचे दिसत आहे.


हवेच्या प्रदुषणामुळे सध्या नागरिकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवल्या आहेत. यामध्ये रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीचा वाटा सर्वात मोठा असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना सतत खोकला, श्वसनाच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील ही खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी विशेष प्रकारच्या 4 “पॉवर स्विपिंग मशीन”ची खरेदी करून या मशीन आणि केडीएमसीचे सफाई कर्मचारी यांचा उत्तम मेळ घालत धुळीविरोधातील ही मोहीम सुरू असल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.


अशी आहे ही विशेष स्वच्छता मोहीम…
धुळीविरोधातील ही विशेष स्वच्छता मोहीम परिणामकारक होण्यासाठी दिवासाऐवजी रात्रीच्या सुमारास ती राबवली जात आहे. केडीएमसीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 4 नव्या पॉवर स्विपींग मशीन आणि 200 सफाई कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दररोज रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक प्रभागातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर “डीप क्लीन” पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. तर सकाळच्या सत्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन सफाईचे काम केले जात असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.


पॉवर स्विपर मशीन-गाडी एक करते काम अनेक…
या विशेष स्वच्छता मोहीमेमध्ये केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांइतकीच “पॉवर स्वीपर मशीन” देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्वच्छतेसाठी विशेष प्रकारे या सीएनजीवर चालणाऱ्या गाडीची निर्मिती करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल 3 टन धूळ गोळा करण्याची त्यावरील मशीनची क्षमता असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. त्यासोबतच स्वच्छता करताना धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलर, डीव्हायडर धुण्यासाठी हायप्रेशर जेट स्प्रे यंत्रणा, गाडीच्या समोरील आणि मागच्या बाजूलाही स्प्रिंकलर, दोन्ही बाजूला रस्त्यावरील धूळ – कचरा – माती सक्शन पद्धतीने साफ करणारे ऍडजस्टेबल दोन ब्रश, धूळ उचलण्यासाठी एक मोठा सक्शन पाईप अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ही पॉवर स्वीपिंग मशीन सुसज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP) अंतर्गत या गाड्या घेण्यात आल्या असून कल्याण डोंबिवलीतील धुळीची पातळी कमी करण्यासाठी त्या काम करत असल्याचेही अतुल पाटील यांनी स्पष्ट केले.


नागरिकांकडून होतंय या मोहिमेचे स्वागत…
रस्त्यावरील धुळीविरोधात केडीएमसीकडून राबवण्यात येणाऱ्या या विशेष स्वच्छता मोहिमेचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात येत आहे. रस्त्यावरील कचऱ्याची नियमित सफाई होत असताना दिसत आहे. मात्र रस्त्यावर साचलेल्या धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. परंतु केडीएमसीकडून गेल्या महिन्याभरापासून राबवण्यात येणाऱ्या या अभियानाचे सकारात्मक परिणाम शहराच्या मुख्य रस्त्यांवर दिसू लागल्याची प्रतिक्रिया डोंबिवलीतील जितेन पाटील यांनी दिली आहे. तसेच रात्री 1 वाजून गेल्यानंतरही शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर केडीएमसीकडून सफाई सुरू असल्याचे आपण प्रत्यक्ष बघितल्याचे सांगत त्यांनी या विशेष स्वच्छता मोहिमेचे स्वागत केले आहे.

दरम्यान केडीएमसी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. तसेच हे अभियान, ही मोहीम यापुढे अशाच प्रकारे परिणामकारक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने सुरूच राहील अशी अपेक्षा व्यक्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा