कल्याण ग्रामीण दि.19 डिसेंबर:
कल्याण ग्रामीण भागामध्ये पाणीप्रश्नामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत मंजूर पाणी कोट्यातील राखून ठेवलेले ३० एम एल डी पाणी या भागासाठी तातडीने दिले जावे आणि भविष्यातील पाण्याची गरज सोडविण्यासाठी या भागासाठी ९५ एमएलडीचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्याची आग्रही मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. नागपूर येथे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडून त्यांनी यासंदर्भात सभागृहात शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. (The issue of water issue in Nagpur session; MLA Rajesh More’s demand to increase 30 MLD of water immediately)
कल्याण ग्रामीण मतदारसंघात पाणीप्रश्न अतिशय तीव्रपणे भेडसावत असून नागरिकाचे पाण्याविना हाल होत आहेत. यामुळेच या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यापासून आमदार राजेश मोरे विविध प्राधिकरणाची भेट घेत हा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर अधिवेशनातही आमदार मोरे यांनी हा प्रश्न उपस्थित करत हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने योग्य ते निर्देश देण्याचा आग्रह धरला.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आडीवली, ढोकळी. पिसवली, गोळवली, दावडी सोनारपाडा, सागाव, सागर्ली, नांदिवली पंचानंद, पी अँड टी कॉलनी, भोपर, देसलेपाडा, संदप, उसरघर, काटई, घारीवली, पलावा, निळजेपाडा घेसर, कोळे, खोणी, हेदुटणे, कासारिओ, पागड्याचा पाडा, भाल, आंतर्ली, शिरढोण, वडवली, पिंपळी यासह बहुतांशी गावात नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. या भागासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून शासनाने १०५ एमएलडी पाणीकोटा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात या भागात दररोज केवळ ५० ते ५५ एमएलडी पाणी पुरवले जाते. यामुळे नागरिकांचे अतिशय हाल होत आहेत. या प्रश्नाला विविध मार्गांनी वाचा फोडण्याचा आणि सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरी या इथला पाणीप्रश्न कायम आहे.
तसेच हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अमृत योजनेचे काम सुरु असल्याचे मोरे यांनी सांगितले. तर ही योजना पूर्ण होताच पाणी प्रश्न सुटेल मात्र तरीही मंजूर कोट्यातील पाणीही सध्या नागरिकांना दिले जात नसून याद्वारे नागरिकाचा हक्क हिरावला जात आहे. यामुळे नागरिकाच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे अशी मागणी मोरे यांनी केली. तसेच लाडक्या बहिणीचा तिन्ही भावावर विश्वास असून बहिणींना भेडसावणारा पाणी प्रश्न शासन लवकरात लवकर सोडवेल अशी अपेक्षा राजेश मोरे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी आणखी ९५ एम एल डी कोटा वाढवून देण्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.