कॉ. दत्ता केळकर जन्मशताब्दी सोहळ्यात डॉ.साद काझी आणि रविंद्र लाखे यांचा सन्मान
कल्याण दि.16 डिसेंबर :
समाजातील आजची परिस्थिती पाहिली तर त्यातून कृतज्ञतेची संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी व्यक्त केली आहे. कल्याण सिटीझन फोरमतर्फे येथील अग्रवाल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कॉम्रेड दत्ता केळकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.या सोहळ्यात कल्याणातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्त्व डॉ. साद काझी यांना कल्याण भूषण तर नाट्यदिग्दर्शक रविंद्र लाखे यांना कुमार केतकर कल्याणरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (The culture of gratitude is on the verge of extinction from the society – senior journalist Kumar Ketkar)
गांधी – नेहरूच नसते तर आपल्या देशाचे काय झाले असते…
सध्या आपण वास्तव जगामध्ये नाहीतर माध्यम प्रेरित कृत्रिम कल्पनाविविश्वामध्ये जगत असून कॉम्रेड दत्ता केळकर यांनी सर्वांना वास्तव जगामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या वास्तव जगाचे भान आणि कृतज्ञता आपल्यामध्ये येणे आवश्यक असल्याचे केतकर म्हणाले. ही कृतज्ञता ही जशी दत्ता केळकर यांच्याबद्दलही पाहिजे तशी आपल्या इतिहासाबद्दलही असली पाहिजे. जर का गांधी – नेहरूच नसते तर आपल्या देशाचे काय झाले असते? जर का 1857, 1872 चे उठाव झाले नसते आणि सुभाषचंद्र बोस, भगत सिंग यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्य लढा दिलाच नसता तर 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं का? असे प्रश्न उपस्थित करत आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला कृतज्ञताभाव बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन कुमार केतकर यांनी उपस्थितांना केले.
डॉ.साद काझी आणि रविंद्र लाखे यांचा सन्मान…
कॉम्रेड दत्ता केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या सोहळ्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल कल्याणातील ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड.साद काझी यांना कल्याण भूषण तर नाट्यक्षेत्रामध्ये तब्बल 50 वर्षाहून अधिक काळ केलेल्या दर्जेदार कार्याबद्दल ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रविंद्र लाखे यांना ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, बँकिंग एम्पलॉइज युनियनचे विश्वास उटगी, ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्या हस्ते कल्याण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय चौधरी आणि त्यांच्या पत्नी संकल्पना चौधरी यांचाही यावेळी विशेष सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. विजय पंडीत तर समारंभ अध्यक्षस्थान म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी भूषविले. तर हा कार्यक्रम आयोजित आणि यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर खराटे, डॉ. प्रशांत पाटील, उमेश बोरगावकर, महेंद्र भावसार, किरण खांडगे, प्रशांत तोष्णीवाल, अनंत गवळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.