कल्याण दि.13 डिसेंबर :
कल्याणच्या व्हर्टेक्स इमारतीमधील काही दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका निर्माणाधीन गगनचुंबी इमारतीमध्ये आग लागली. मात्र सुदैवाने अग्निशमन दलाला दिलेल्या वेळेत माहितीमुळे अवघ्या अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा सर्कल येथे रॉकमाऊंट नावाची ही गगनचुंबी इमारत असून तिच्या पहिल्या चार मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित रहिवासी इमारतीच्या मजल्याचे काम अद्याप सुरू आहे. यापैकी व्यावसायिक वापराच्या (commercial hub) असलेल्या पहिल्या चार मजल्यांपैकी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये ही आग लागली होती अशी माहिती केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. तसेच याबाबत एका जागरूक नागरिकाने आपल्याला स्वतः ताबडतोब फोनवर माहिती दिली. आणि अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत लगेचच या आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहितीही चौधरी यांनी दिली. तर आग भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या घटनास्थळी मागवण्यात आल्या होत्या असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान ही आग लागल्याची माहिती समजताच खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीचा वीज पुरवठा खंडित करून चारही मजल्यांवर असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच याच भागाच्या जवळ असलेल्या व्हर्टेक्स इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती.