Home ठळक बातम्या कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व...

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवणे बंधनकारक

(प्रतिनिधिक छायाचित्र)

कल्याण आरटीओने दिली 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत

कल्याण दि.11 डिसेंबर :
महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट – HSRP) बसविणे बंधनकारक करण्यासंबंधीचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर ही HSRP हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसवण्याचे आवाहन कल्याण आरटीओचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे. ही HSRP हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून कल्याण उप प्रादेशिक कार्यालयाकरता मे. रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती करत त्यासाठी लागणारे शुल्कही निर्धारित करण्यात आले आहे.(Important news for motorists in Kalyan RTO area; Mandatory fitment of high security number plates on all vehicles before April 1, 2019)

सर्वोच्च न्यायालयाकडून अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी…
राष्ट्रीय सुरक्षा, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.

HSRP नंबरप्लेटची अशी आहेत वैशिष्ट्य…
राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना HSRP नंबरप्लेट सक्तीची केली असून वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.

ही HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी लागणार इतके शुल्क…
HSRP हाय सिक्यूरिटी नंबरप्लेटचे महत्व लक्षात घेता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून त्याकरीता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून ही नंबरप्लेट बसवून घेता येईल. त्यासाठी दुचाकी आणि ट्रॅक्टर: रु.450/- (जीएसटी वगळून), तीन चाकी: रु.500/- (जीएसटी वगळून), हलकी मोटार वाहने/ पॅसेंजर कार/ मिडियम कमर्शियल वाहन/ अवजड कमर्शियल वाहन आणि ट्रेलर/ कॉम्बिनेशन: रु.745/- (जीएसटी वगळून) हे शुल्क निर्धारित केले आहे.

या वेबसाईटवर माहिती होणार प्रसिद्ध…
नियुक्त केलेली एजन्सी आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रँचायझी सुरु करुन वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. याबाबतची माहिती – निर्देश एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक लवकरच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

जुन्या वाहनांना कागदपत्रे तपासून लावून मिळणार एचएसआरपी नंबरप्लेट…
परिवहन विभागाने 31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना HSRP नंबरप्लेट लावणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावून मिळणार असल्याची माहिती कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा