कल्याणच्या मुथा महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत 150 कॉलेजेसचा सहभाग
कल्याण दि.11 डिसेंबर :
कल्याणात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या अंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये बी. के. बिर्ला महाविद्यालयाने चॅम्पियन्सशीप ट्रॉफी पटकावली. कल्याणातील शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये दीडशे महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप कल्याण शहराध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. (Birla College of Kalyan wins Mumbai University Inter-College Wrestling Tournament)
कुस्तीचा खेळ हा फक्त शक्तीचा नसून तो बुद्धीचाही आहे. आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे की 800 महाविद्यालय असणाऱ्या या मुंबई विभागाच्या कुस्तीच्या स्पर्धा भरविण्याचा मान कल्याणच्या मुथा महाविद्यालयाला मिळाला सध्याच्या काळात ऑलिंपिक स्पर्धेत भारताला अनेक पदके मिळवून दिली. अशा प्रकारच्या स्पर्धा पुढच्या यशासाठी उपयोगी ठरतात, अशा भावना व्यक्त करून सूर्यवंशी यांनी यावेळी स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा, ट्रस्टी मनीष मुथा, अन्वेशा मुथा, महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुजा ब्रह्म, सीबीएससी स्कूल प्राचार्या सपना गदिया, अग्रवाल कॉलेज चे ट्रस्टी माजी नगरसेवक ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, मुंबई विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशनचे डॉ. मनोज रेड्डी, स्पोर्ट्स विभागाचे सदस्य डॉक्टर चंद्रकांत म्हात्रे, ठाणे झोन सेक्रेटरी राहुल अकुल, मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कमिटी मेंबर डॉक्टर शिल्पा शेरेगल, मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कमिटी मेंबर डॉक्टर रवींद्र गायकर, प्रमोद बोराडे या प्रसंगी उपस्थित होते.
या स्पर्धेचा प्रारंभ एकाच वेळी दोन वजनी गटांमध्ये करण्यात आला. डीएसपी कॉलेज तसेच रिझवी कॉलेज यांच्या 125 किलो वजनी गटात पहिली कुस्ती पार पडली. तसेच रामशेठ ठाकूर कॉलेज कांदिवली, भवन्स कॉलेज यांच्या 86 किलो वजनी गटात पार पडली. 125 किलो वजनी गटात सोहम म्हात्रे, 86 किलो वजनी गटात सिद्धेश खडकर विजेते ठरले. तर या स्पर्धेच्या 2ऱ्या दिवशी महिला गटात 44 महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 59 किलो वजनी गटात बिर्ला महाविद्यालयाची वेदिका पाटील प्रथम, 55 किलो वजनी गटात बिर्ला महाविद्यालयाची स्वराली तोत्रे प्रथम, 76 किलो वजनी गटात सुरेखा थले प्रथम, 72 किलो वजनी गटात अनुष्का टेमघरे स्वयंसिद्धी कॉलेज प्रथम आल्या.
तर या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पारितोषिके मिळणाऱ्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाला मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आली. तर दुसरी चॅम्पियंसट्रॉफी अभिनव महाविद्यालयाला मिळाली. मुथा महाविद्यालयचे स्पोर्ट्स विभागाचे दिनेश थळें, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनील सूर्यराव यांनी केले.