Home ठळक बातम्या दोन दशकांची सांस्कृतिक परंपरा; डोंबिवलीत उद्यापासून 20 व्या आगरी महोत्सवाची धूम

दोन दशकांची सांस्कृतिक परंपरा; डोंबिवलीत उद्यापासून 20 व्या आगरी महोत्सवाची धूम

(प्रतिनिधिक फोटो)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

डोंबिवली दि.9 डिसेंबर :
सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरुदावली मिळवलेल्या डोंबिवली नगरीच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर टाकलेल्या आगरी महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. आगरी युथ फोरमतर्फे आयोजित या महोत्सवाचे यंदा विसावे (20 वे) वर्ष असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने २००४ पासून “अखिल भारतीय आगरी महोत्सव” भरवण्यात येतो. ज्यामध्ये केवळ कल्याण डोंबिवलीकरच नव्हे तर ठाणे, रायगड, मुंबईकरसुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. यंदाच्या आगरी महोत्सवाला दोन दशकं पूर्ण झाल्याचे कोंदण लाभले असून हा 20वा अखिल भारतीय आगरी महोत्सव 10 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत संतश्रेष्ठ वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे..

अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे “एक आनंदाची पर्वणी” या आनंदाच्या पर्वणीमध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महोत्सवाला भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंद वस्तूंच्या खरेदीचा, संगीत नृत्य प्रेमींना आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद, खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खाद्य पदार्थाचा, बच्चे कंपनीबरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आनंद घेता यावा यासाठी यंदाही महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केली असल्याची माहिती आगरी युथ फोरमच्या गुलाब वझे यांनी दिली.

तर चूल आणि मूल या संसार चक्रात अडकलेल्या आमची माताभगिनी आज संसार चक्र भेदून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे अशा महिला वर्गाच्या सन्मानार्थ महोत्सव मध्ये एक दिवस महिलांसाठी राखून असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे.

आगरी कोळी समाजातील लग्नसोहळे हे वैशिष्ट्यपूर्ण असेच असतात. या लग्न सोहळ्यामध्ये धवला गायनाला विशेष महत्व असते. एखा‌द्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पौराहित्य करणान्या गुरुजीच्या वेदमंत्रांना जसं महत्व असते तेवढेच महत्व या लग्न सोहळ्यामधील धवल्याला असते. समाजामधील महिला या धवला गीतांचे मौखिकरित्या संवर्धन करत असते. अशा लग्न सोहळ्यामधील धवला गाणाऱ्या लाडक्या बहिणीच्या मुलाखतीच्या कार्यक्रम” धवला आगरी पौराहित्य या शीर्षकाखाली आयोजीत करण्यात आलेला आहे.

वसुधैव कुटुंबकम अध्यात्मक पिठामधील कैवल्यपाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुलमध्ये अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या वि‌द्यार्थ्यांचा टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या हरिपाठाचे कार्यक्रमांमुळे आगरी महोत्सव परिसरातील वातावरण मंगलमय होणार आहे.

माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत असताना त्याच्या धकाधकीच्या जीवनातून मनाला विसावा देण्याचे काम लोकगीतातून होत असते. म्हणूनच लोकगीत म्हणजे माणसाच्या मनाचा आरसा समजला जातो. आगरी कोळी गीतांमध्ये हा भाव ठळकपणे दिसून येतो. आगरी समाजामधे अनेक कवी गीतकार आहेत त्यामध्ये गीतकार अनंत पाटील यांचं नाव अग्रभागी आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीत आणि स्वराची जोड मिळाल्याने ती अजरामर झालेले आहेत. असे गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आगरी समाजातील प्रसिद्ध गायकांचा सहभाग असणाऱ्या आगरी कोळीगीतातील भाव सौदर्य या मुलाखत पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रसिद्ध गायक श्री जगदीश पाटील, बिग बॉस फेम, दादूस सतीष चौधरी, गायक योगेश आग्रावकर, रॉक सिंगर सपना पाटील, बदामचा बादशहा सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत प्रसिद्ध निवेदक प्रतिक कोळी.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गेल्या अनेक दशकापासून मराठी जनतेची मागणी होती. मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेने सर्व निकष पूर्ण केलेले असल्याने केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा कसा विकास घडून येणार आहे या संदर्भात सर्वसामान्य मराठी माणूस अनभिज आहे. ही सर्वसामान्य जणांची अनभिजता दूर व्हावी मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा प्रांतातील साहित्यिकांचा सहभाग असलेल्या परिसंवादाचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे. या परिसंवादामध्ये अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, 91 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे उपस्थित राहणार असून त्यांच्याशी समन्वय साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे.

यावर्षीच्या महोत्सवमध्ये वाचकांसाठी दर्जेदार विविध विषयानवरील लाखों पुस्तकांचा खजिनांच उपलब्ध असणार आहे. ज्यांमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत भाषेतील पुस्तकांचा भरणा असणार आहे.

या विज्ञान युगामध्ये माणसाचे जीवन अत्यंत धावपळीचे झालेले आहे. सत्ता संपत्तीच्या मागे धावत असताना त्याचे स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे त्यामुळे त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा आजारांना बळी पडावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून आपली तब्येत कशी सांभाळावी याबाबत माधवबाग स्वास्थ्य परिवारातील डॉक्टर प्रवीण घाडीगावकर उपस्थित राहुन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

प्रबोधनात्मक कार्यक्रमांप्रमाणे लोकरंजन करण्यासाठी दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत त्याचप्रमाणे कलर्स मराठी वाहिनीवरील प्रक्षेपित होणारी लोकप्रिय मालिका” लय आवडते तू मला,” अशोक मामा “व पिंगा ग पोरी पिंगा” या मालिकांमधील तसेच “मुक्काम पोस्ट बॉबीलवाडी” या चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार महोत्सवमध्ये सदिच्छा भेट देणार असून प्रेक्षकांना त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधीही मिळणार आहे. त्याचप्रमाणे आगरी महोत्सवमधील “एक आनंदाच्या पर्वणी” मध्ये आपला आनंद ‌द्विगुणीत करण्यासाठी अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले बी यु निक उर्फ निक यांचे लाखो फालोवर्स आहेत. ते तरुणांना स्फूर्तीदायी ठरणारे टॉक शो आगरी महोत्सवमध्ये करणार आहेत.

महोत्सवसाठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार संजय धबडे आणि ओम साई डेकोरेटर्स हे नेपथ्याचे काम करणार आहेत. महोत्सव कालावधीमध्ये लकी ड्रा च्या माध्यमातून दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणीचा मान मिळणार आहे. तसेच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती ही आपल्याला मिळणार आहे त्याची घोषणा महोत्सव मंचावरुन एक दिवस अगोदर करण्यात येईल.

हा आठ दिवस चालणारा सांस्कृतिक यज्ञ यशस्वी करण्यासाठी आगरी युथ फोरमच्या गुलाब वझे, बंडू पाटील, पी.जी. म्हात्रे, जालिंदर पाटील, विश्वनाथ रसाळ, प्रभाकर चौधरी, अशोक पाटील, सदानंद पाटील, अशोक म्हात्रे, दत्त्ता पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा