कल्याण डोंबिवली दि.9 डिसेंबर :
दक्षिण भारतातील चक्रीवादळामुळे आठवडाभर गायब झालेल्या थंडीने जोरदार कमबॅक करत कल्याण डोंबिवली सह संपूर्ण एमएमआर परिसराला गारठवून टाकले आहे. परिणामी कल्याण आणि डोंबिवली चा पारा चांगलाच घसरला असून थेट 13 अंशापर्यंत खाली आला आहे.
दक्षिण भारतात आलेल्या फेंगल या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवला. गुलाबी थंडीने कुडकुडणारा महाराष्ट्र या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमध्ये भिजून गेला. ज्याप्रमाणे अचानकपणे काही कळायच्या आतच ही थंडी जशी गायब झाली. कल्याण डोंबिवलीकर कधी नव्हे ते अशा गुलाबी थंडीचा आस्वाद घेत असताना मध्येच फेंगलच्या रूपाने माशी शिंकली आणि सर्वांचा हिरमोड झाला.
मात्र ज्याप्रमाणे कोणासही थांगपत्ता लागू न देता गायब झालेली ही गुलाबी थंडी आपल्या आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नुसतीच परत आली नाही तर एकदम दणक्यात आली. आल्या आल्याच पहिल्याच रात्रीत तिने
कल्याण डोंबिवलीकरांना चांगलेच गारठवून सोडले. त्यामुळे सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या अनेक नागरिकांनी या गुलाबी थंडीने कुडकुडत स्वागत केले. आज कल्याणमध्ये अवघे 13.2 इतके कमी तर डोंबिवलीत त्यापेक्षा किंचित अधिक म्हणजे 13.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली आहे.
तसेच हवामान अभ्यासक अभिजीत मोडक ह्यानी अंदाज वर्तवल्याप्रमाणे उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभमुळे सिमला आणि इतर हिमालयाच्या डोंगरात बर्फवृष्टी झाली आहे. आणि त्याच्या प्रभावामुळे आपल्या इथे उत्तरेकडून गार वारा वाहू लागला आणि आर्द्रता घसरून कोरडी हवा सुरू झाली आणि तापमानात पटकन घट पाहायल्या मिळाल्याचे मोडक यांनी सांगितले.
प्रमुख शहरातील तापमान…
कल्याण 13.2
डोंबिवली 13.5
बदलापूर 11.3
कर्जत 11.5
अंबरनाथ 12.1
विरार 12.1
मुंबई 13.7
नवी मुंबई 14