हत्येचा प्रयत्न, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ल्यासह विविध गुन्हे दाखल
कल्याण दि.5 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या आंबिवलीतील मुंबई पोलिसांवरील हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 25 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दगडफेक करणाऱ्या उर्वरित लोकांचा खडकपाडा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे. (attack-on-mumbai-police-in-ambivali-fir-lodged-on-25-people-in-stone-pelting-case-and-four-people-have-been-detained)
बुधवारी रात्रीच्या सुमारास एका आरोपीला पकडण्यासाठी मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक कल्याणजवळील आंबिवलीत आले होते. संबंधित आरोपीला घेऊन हे पथक आंबिवली स्टेशनवर आले असता ईराणी वस्तीतील जमाव तिकडे आला आणि अचानक या जमावाने तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये एमआय डीसी पोलिसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांवर जमावाने केलेल्या या दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जमावातील काही जण रेल्वे ट्रॅकखाली असलेले दगडं उचलून पोलिसांवर फेकत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी जमावातील काही महिला या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
या गंभीर प्रकारानंतर खडकपाडा पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला अशा विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले. तसेच 20 ते 25 जणांवर हे गुन्हे दखल करून त्यापैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरित आरोपींचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या गंभीर प्रकरणानंतर आंबिवलीतील ईराणी वस्ती आणि तिथली गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून यापूर्वीही पोलीसांवर हल्ले होण्याचे असे प्रकार घडले आहेत. ते पाहता हे प्रकार कधीपर्यंत घडत राहणार ? पोलीस प्रशासन आणखी किती वेळा यांचा मार खाणार? यांच्या मनामध्ये पोलीस आणि कायद्याबाबत धाक निर्माण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही होणार की नाही ? यासारखे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.