कल्याण दि.2 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालय परिसरात मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
केडीएमसी अग्निशमन दलातर्फे दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये न चुकता हे रक्तदान शिबिर घेण्यात येते. ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या भागातील अनेक रक्तदात्यांनी यंदाही आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. या रक्तदान शिबिरात जमा झालेले रक्त कल्याण पडघा मार्गावर असलेल्या लाईफलाइन ब्लड सेंटरला देण्यात आले. या शहरासाठी आणि समाजासाठी असणारे आमचे सामाजिक भान लक्षात घेऊन दरवर्षी आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवत असतो. आणि अनेक रक्तदाते त्यामध्ये रक्तदान करून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
यावेळी भाजप नेते वरुण पाटील, वझे प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. दिपक वझे यांच्यासह कल्याणातील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी या शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या.