Home ठळक बातम्या केडीएमसी उपायुक्तांकडून निवारा केंद्रांची अचानक पाहणी ; बेघरांची केली आस्थेवाईकपणे चौकशी

केडीएमसी उपायुक्तांकडून निवारा केंद्रांची अचानक पाहणी ; बेघरांची केली आस्थेवाईकपणे चौकशी

कल्याण डोंबिवली दि.1 डिसेंबर :
बेघर व्यक्तींसाठी केडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत त्याठिकाणी बेघर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या बेघर निवारा केंद्रांना केडीएमसीच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी अचानक भेट देत निवारा केंद्राची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढल्याने या केंद्रातील व्यक्तींना कसली अडचण तर नाहीय ना, याबद्दल संजय जाधव यांनी यावेळी आस्थेवाईकपणे चौकशीही केली. (surprise inspection of shelter centers by KDMC Deputy Commissioner; Careful inquiry into the homeless)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बेघरांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंग वाडी, तसेच टिटवाळा आणि कल्याण पश्चिमेत महानगरपालिकेने बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्र उभारण्यात आली असून त्याठिकाणी या व्यक्तींच्या राहण्याची-खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारा केंद्रांत बेघर व्यक्तींना चहा, नाष्टा, जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये गारठा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शनिवारी रात्री 11 वाजता कल्याण पश्चिमेतील क प्रभागाजवळ तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बेघरांच्या निवारा केंद्राला तसेच डोंबिवलीच्या पांडुरंग वाडीतील सावली निवारा केंद्राला भेट दिली. तेथे बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी आणि सुविधांची पाहणी केल्यानंतर उपायुक्त जाधव यांनी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशीही केली. रात्रीच्या वेळी पडलेल्या कडाक्याच्या थंडीचे स्वरूप पाहता तेथील बेघरांना पांघरण्यासाठी पुरेशा प्रमाणात चादरी उपलब्ध आहेत का? महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा व्यवस्थित दिल्या जातात का? आणखी काही या व्यक्तींना पाहिजे हवे का ? याचीही जाधव यांनी यावेळी खातर जमा केली.

सध्या कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रात पडलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर रात्रीचे वेळी रस्ते, फूटपाथ, उघड्यावर झोपलेली एखादी बेघर व्यक्ती आढळून आल्यास त्वरित महापालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा