Home ठळक बातम्या “बाबा,तुमचा खूप अभिमान वाटतो”…डॉ.श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदेंसाठी भावूक पोस्ट

“बाबा,तुमचा खूप अभिमान वाटतो”…डॉ.श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदेंसाठी भावूक पोस्ट

 

कल्याण दि.28 नोव्हेंबर :
राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्माण झालेला सस्पेन्स काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट लिहित “तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा” अशी भावना व्यक्त केली आहे. (“Dad, so proud of you”… Dr. Shrikant Shinde’s emotional post for Eknath Shinde)

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका मांडली जात होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उलट सुलट चर्चा आणि सस्पेन्स निर्माण झाला होता.

मात्र एकनाथ शिंदे यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेत आपण एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आतापर्यंत काम केले आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही आपल्याला प्राप्त झालेली कोणत्याही पदापेक्षा सर्वात मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत जो काही निर्णय घेतील त्याला महायुतीतील घटकपक्ष म्हणून शिवसेनेचे संपूर्ण समर्थन असेल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला असून या सर्व राजकीय घडामोडींवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक मुलगा या नात्याने भावनिक भाष्य केले आहे.

 

खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पोस्ट जशीच्या तशी….

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे.

खूप अभिमान वाटतो बाबा !

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा