Home ठळक बातम्या व्हर्टेक्स इमारत आग ; अखेर 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश,

व्हर्टेक्स इमारत आग ; अखेर 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश,

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही मात्र आगीमध्ये 5 फ्लॅट जळून भस्मसात

कल्याण दि.26 नोव्हेंबर :
कल्याणातील व्हर्टेक्स इमारतीमध्ये लागलेल्या आगीवर अखेर 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीमध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी या भीषण आगीमध्ये इमारतीमधील 5 फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी घरामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आज सायंकाळी 5.45 मिनिटांच्या सुमारास इमारतीच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली. आणि पाहता पाहता आगीने अत्यंत भीषण असे रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराने पेट घेतला. तर या आगीची झळ नसल्याने त्याच्या वरच्या भागात असलेले फ्लॅटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर स्थानिक रहिवाशांनी सोसायटीच्या उपलब्ध अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे रौद्ररूप पाहता तो तोकडा पडला.

दरम्यान आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या बहुमजली इमारतीमधील 14 व्या मजल्यावर ही आग लागल्याने तिथपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या. तर आग लागलेल्या मजल्याच्या वरील मजल्यावर काही लोकं अडकून पडले होते. ही माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, सिव्हिल डिफेन्स आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर आगीची भीषणता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा वीज पुरवठा बंद करून काही वेळात ही संपूर्ण इमारतच रिकामी करण्यात आली. सुदैवाने या भीषण आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तास शर्थीचे प्रयत्न करत अखेर पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र आग लागलेल्या इमारतीमधील अनेक कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत दिसत होते.

या आगीचे भीषण स्वरूप पाहता झोन 4 चे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्यासह केडीएमसीचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या भीषण आगीनंतर बहुमजली इमारती आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा