Home ठळक बातम्या गुलाबी थंडीची चाहूल : कल्याण डोंबिवलीचा पारा आला 15 अंशांवर

गुलाबी थंडीची चाहूल : कल्याण डोंबिवलीचा पारा आला 15 अंशांवर

कल्याण डोंबिवली दि.26 नोव्हेंबर :
एकीकडे विधानसभा निवडणुकांमुळे राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच वातावरणाचा पारा मात्र हळूहळू घसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतही गुलाबी थंडीची चाहूल लागली असून आज इथला पारा थेट 15 अंशांपर्यंत खाली आल्याचे दिसत आहे. केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये तापमान लक्षणीयरित्या कमी नोंदले गेल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएन (LNN)ला दिली आहे. (cold weather: Kalyan Dombivli’s mercury Drops to 15 degrees)

गेले महिनाभर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जाणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकारणाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून आला. मात्र मतदानाच्या दिवशीपासून म्हणजेच साधारणपणे 20 तारखेपासून भौगोलिक तापमानामध्ये काहीशी घसरण जाणवत होती. आणि आज अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एम एम आर रिजनमध्ये यंदाच्या मोसमातील नोव्हेंबर महिन्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याचे अभिजीत मोडक यांनी सांगितले. तसेच येत्या एक दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी कमी होणार असून या महिना अखेरीसपर्यंत असेच तापमान राहील असा अंदाजही त्यांनी वर्तवली आहे. आज कल्याणमध्ये 15 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत आज 15.7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली

15 नोव्हेंबरनंतर आपल्याकडे थंडीची चाहूल जाणवते. एकीकडे कोरडी हवा, त्यामुळे कमी झालेली आर्द्रता आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत हवा असल्याने रात्रीतून आपल्याकडे ही तापमानाची घट जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

एमएमआर रिजनमधील इतर शहरांचे तापमान…

कल्याण 15
डोंबिवली 15.7
कर्जत 13.5
बदलापूर 13.6
अंबरनाथ 14
उल्हासनगर 14.6
पलावा 14.5
पनवेल 14.3
पालघर 14.7
ठाणे 16.6
नवी मुंबई 16

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा