Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीण विधानसभा : विजय राजेश मोरेंचा परंतू चर्चा मात्र खा. डॉ.श्रीकांत...

कल्याण ग्रामीण विधानसभा : विजय राजेश मोरेंचा परंतू चर्चा मात्र खा. डॉ.श्रीकांत शिंदेंच्या “मास्टर स्ट्रोक”ची

शेवटच्या 3 दिवसांत मतदारसंघ पिंजून काढत खेचून आणली विजयश्री

कल्याण ग्रामीण दि.26 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवलीतील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत आपला हा बालेकिल्ला अभेद्य राखल्याचे दिसून आले. या चारपैकी तीन ठिकाणी मतदारांनी विद्यमान आमदारांच्याच बाजूने कौल दिला. अपवाद तो केवळ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा. याठिकाणी मतदारांनी आजी – माजी आमदारांना नाकारत ‘प्रामाणिक कार्यकर्ता’ अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या राजेश मोरे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. तब्बल 66 हजारांपेक्षा अधिक मतांनी मोरे यांनी विजय प्राप्त केला असला तरी सध्या चर्चा सुरू आहे, ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या विजयासाठी खेळलेल्या “मास्टर स्ट्रोक”ची.

मुख्यमंत्री आणि खा.डॉ शिंदे यांचे विश्वासू सहकारी…
कल्याण ग्रामीण हा संसदरत्न खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेतील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ. आणि महायुतीकडून उमेदवारी मिळालेले राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू सहकारी. त्यामुळे आपसुकच या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाला एक वलय प्राप्त झाले होते. साहजिकच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील या मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून होते. परिणामी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नेमका काय निकाल लागतो याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.

लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य…
मे महिन्यांत म्हणजे अवघ्या 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून डॉ.श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेत विद्यमान आमदार राजू पाटील यांनाही तशाच सूचना केल्या होत्या. त्यानुसार मनसेकडून लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा भक्कम पाया रचल्याचे दिसून आले. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड होणार असल्याचे बोलले जात होते.

शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना प्रचारात उडी…
मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे कल्याण ग्रामीणमधील राजकीय चित्रही बदलले. आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नावाची घोषणा झाली. त्यातच
डोंबिवली आणि दिव्याच्या सभेमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. ही टिका सहन न झाल्याने आतापर्यंत सामंजस्याच्या भूमिकेत असणाऱ्या खा. डॉ .श्रीकांत शिंदे यांनी प्रचारादरम्यान शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना प्रचारात उडी घेतली. आणि खऱ्या अर्थाने या टीकेतूनच मग राजेश मोरे यांच्या आताच्या दणदणीत विजयाची बीजे रोवली गेली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आणि खा. डॉ.शिंदेंनी घेतली सूत्रे हाती…
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मग महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे हाती घेतली. लोकसभा निवडणुकीतील दांडगा अनुभव, जबरदस्त जनसंपर्क आणि आपल्या राजकीय आराखड्यांच्या बळावर खासदार डॉ. शिंदे यांनी अत्यंत नियोजनबध्द आखणी केली. त्यातही कल्याण लोकसभेतील इतर विधानसभा मतदारसंघाप्रमाणे कल्याण ग्रामीणमध्येही खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून अनेक मोठमोठाल्या आणि गेमचेंजर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ज्यामुळे कल्याण ग्रामीणचा केवळ चेहरा मोहराच बदलणार नाही तर पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्व त्याला प्राप्त झाले आहे.

मताधिक्य राजेश मोरे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत राखले कायम…
या पार्श्वभूमीवर या सर्व विकासकामांची शिदोरी आणि जोडीला दस्तुरखुद्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सक्रीय नेतृत्व पाठीशी भक्कमपणे उभे ठाकल्याने इकडेच राजेश मोरे यांच्या दणदणीत विजयाची पायाभरणी झाली. शेवटच्या तीन दिवसांमध्ये तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. आणि अशी काही जादूची कांडी फिरवली की मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मिळालेले मताधिक्य राजेश मोरे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखले. यावरूनच खासदार डॉ. शिंदे यांनी राजेश मोरे यांच्या विजयासाठी घेतलेली मेहनत, अखेरच्या टप्प्यात केलेलं यशस्वी नियोजन आणि लढवलेले डावपेच यांचा अंदाज येऊ शकतो.

आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राजेश मोरे यांना मिळालेली तब्बल 1 लाख 41 हजारांहून अधिक मते आणि 66 हजारांहून अधिक मतांनी मिळवलेला विजय हा जितका मोठा आहे. तितकाच आपल्या या विश्वासू सहकाऱ्याच्या खणखणीत विजयासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळलेला “मास्टर स्ट्रोक” हा त्यापेक्षा कांकणभर सरस ठरला आहे.

©️©️©️©️©️

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा