कल्याण पूर्व दि.16 नोव्हेंबर :
ज्या नरेंद्र मोदीने नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये यांना पैसे खाऊ देत नव्हतो म्हणून गद्दारांनी आपले,सरकार पाडले अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. (They toppled MVA government because they were not paying money – Uddhav Thackeray’s attack on the opposition)
कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात कल्याण पूर्वेचे उमेदवार धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमेतील उमेदवार सचिन बासरे, अंबरनाथ विधानसभेचे राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. ही विधानसभा निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न नाहीये. तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. खड्ड्यात घातलेला हा महाराष्ट्र कोणत्या दिशेला न्यायचाय हे आताच ठरवावे लागेल. तर लोकसभेत हरल्यामुळे त्यांचे बटेंगे, कटेंगेचे त्यांचे फटेंगे झाले असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडवली.
तर शिवसेनेची भाजप झालेली नाही, आम्ही अजिबात हिंदुत्व सोडलेले नाहीये, तर आमचे हिंदुत्व हे हातामध्ये काम आणि मूह मे राम या संकल्पनेवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली पुण्याई आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठशी आहेत. माझ्या पक्षाचे नाव हे माझ्या वडील आणि आजोबांनी ठेवलेला पक्ष असून निवडणूक आयोगाचा आदेश आपण अजिबात मानत नाही. तर एकनाथ शिंदे यांना आपण काय नाही दिले? जर आपण त्यांना मंत्रिपद दिले नसते तर ते आज मुख्यमंत्री झाले असते का? मुलाला खासदारकीची खुर्ची दिली नसती तर आज खासदार झाले असते का ? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
मोदीएवढा थापाड्या आपण पाहिला नाही…
तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा थापाड्या व्यक्ती पाहिला नाही. मात्र काहीही झाले तरी या निवडणुकीत मोदी शहांचा महाराष्ट्र आपण होऊ देणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
यावेळी सचिव माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, उपनेते विजय साळवी, उपनेते अल्ताफ शेख, संघटक रविंद्र कपोते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, कल्याण पूर्व शहर प्रमूख शरद पाटील, कल्याण जिल्हा प्रमूख अल्पेश भोईर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.