कल्याण दि.21 ऑक्टोबर :
भाजपने कल्याण पूर्वेतून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली असून शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध करत बंडाचे निशाण फडकावले आहे.
भाजपने आपली पहिली यादी जाहीर करून अवघे काही तासही उलटले नसतानाच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरीची चिन्हं दिसत आहेत. शिवसेनेच्या कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमूख निलेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. (shiv-sena-shinde-faction-opposes-bjp-candidate-in-kalyan-east-so-we-will-fight-and-win-as-a-mahayuti-bjp-believes)
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठींबा देण्याऐवजी, शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याला निवडणुकीमध्ये उभे करण्याचा आमचा विचार सुरू असून यासंदर्भात पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल असे स्पष्ट केले.
तर आम्ही महायुती म्हणूनच लढणार आणि निवडूनही येणार – भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी
दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या या भूमिकेबाबत भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की याबाबत महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेते नक्कीच मार्ग काढतील. आम्ही सर्व जण एकत्र होतो आणि एकत्रच राहू. आगामी विधानसभा निवडणुक आम्ही महायुती म्हणून लढू आणि महायुती म्हणूनच जिंकून येऊ असा विश्वासही नरेंद्र सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला.