कल्याण दि.9 ऑक्टोबर :
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कल्याण पश्चिम मतदारसंघात नक्कीच मशाल तळपणार असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Shiv Sena’s Uddhav Balasaheb Thackeray candidate Sainath Tare’s wish to Will contest the election from Kalyan West Assembly Constituency)
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून महायुती आणि महविकास आघाडी असे दोघेही सध्या जागावाटपाच्या चर्चेत व्यस्त आहेत. अद्याप दोघांकडूनही जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इच्छुक उमेदवारांकडून मात्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटातून उध्दव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या साईनाथ तारे यांनीही कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. पक्ष प्रवेश करतेवेळी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला कल्याण पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असून आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही साईनाथ तारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच आपण ही निवडणूक रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अन्यायकारक कर घेऊनही दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या सुविधा अशा प्रमुख मुद्द्यांवर लढणार आहे. इथल्या लोकांसाठी आपण अधिकाधिक चांगले काम करण्याचा 100 टक्के प्रयत्न करू आणि आपल्याला विश्वास आहे की या निवडणुकीत कल्याण पश्चिमेत मशालच तळपेल असा ठाम विश्वासही साईनाथ तारे यांनी यावेळी व्यक्त केला.