कल्याण दि.5 ऑक्टोबर :
ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टे आणि उद्याने विकसित करणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे. 1 ऑक्टोबरच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केडीएमसीतर्फे कल्याणच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात नुकताच ज्येष्ठ नागरिक सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ बोलत होत्या.(KDMC will create parks and parks for senior citizens – KDMC Commissioner Dr. Indu Rani Jakhad)
ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरिक कट्यांवर मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून शासनाच्या वयोश्री आणि मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा लाभही ज्येष्ठ नागरिकांना घेता येऊ शकेल. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नविन जागा उपलब्ध करुन देण्याचाही केडीएमसी प्रशासनाचा मानस असल्याचे आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये फोर्टीज हॉस्पीटलचे न्युरो सर्जन डॉ.जयेश सरधारा यांनी मेंदूच्या विकारांबाबतची माहिती- उपचार- आहार आणि व्यायामाची माहिती दिली. मायक्रो न्युरोसर्जन डॉ.ऋषभ छेडा आणि हृदय विकारतज्ञ डॉ.झाकीया खान यांनी ह्दयविकार टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाय- आहाराची माहिती दिली. त्याचप्रमाणे आर्थोपेडीक सर्जन डॉ.स्वप्निल केणी यांनी वातांचे प्रकार, त्याची कारणे, उपचार आणि आहाराची प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली. तर वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा, प्रथमोपचार कसे करावेत याबाबतही फोर्टीज हॉस्पीटलच्या परिचारीकांनी स्कीट सादर केले. तर कॉर्पोरेट किर्तन कार्यक्रमफेम निरुपणकार समीर लिमये यांनी समर्थ रामदासांच्या दासबोधाचे अतिशय सोप्या सहज भाषेत निरुपण करीत ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे कल्याणमधील पदाधिकारी यशवंत कोसळुकर, आयस्कॉनचे अध्यक्ष महादेव ढोकळे, कोकण प्रादेशिक विभाग फेसकॉमचे अध्यक्ष विलास काळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ. प्रशांत पाटील यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. समाज विकास विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी शासनाच्या वयोश्री आणि मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेची सविस्तर माहिती आपल्या प्रास्ताविकाद्वारे उपस्थितांना दिली. तसेच त्यांच्याच हस्ते कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी आणि समन्वय समितीच्या पदाधिका-यांचा प्रशस्तीपत्र – स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सांगता निवेदक महेश देशपांडे, माहिती- जनसंपर्क अधिकारी माधवी प्रमोद पोफळे, श्रृती कानिटकर यांनी गायलेल्या पसायदानाने झाली. ज्येष्ठ नागरिकांना डोंबिवली येथून कल्याण (प )येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिकेच्या बसद्वारे घेऊन येणे आणि जाण्याचे नेटके नियोजन डोंबिवली ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सुरेश पालकर आणि डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी केले.